चिखलीत तरुणाचा मृतदेह आढळला; खुनाचा संशय
पिंपरी : चिखली येथील स्पाइन रस्त्यावर घरकुल चौकाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
1 मिनट पठन

पिंपरी : चिखली येथील स्पाइन रस्त्यावर घरकुल चौकाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाचे पाय काळेनिळे पडले होते. तसेच मृतदेहाजवळ दगड आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लाल बहादूर राम (वय २४, रा. नेवाळे वस्ती, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल चौकाजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी मृत तरुणाचे पाय काळेनिळे पडल्याचे निदर्शनास आले. तसेच मृतदेहाजवळ दगड पडलेले आढळले. त्यामुळे तरुणाचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविला. दरम्यान, पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटविली. तो नेवाळे वस्ती परिसरात राहत होता. मजुरी करून मिळेल ते काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. खुनाच्या संशयातून पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
