मुख्य सामग्री पर जाएँ

कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ची चाहूल? संदेश पारकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा; स्वतःच दिले स्पष्टीकरण

शिवसेनेच्या बैठकीला उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; भाजप की शिंदेसेना, योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे पारकरांचे सूचक विधान

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी यापूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता कोकणातही राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव येथे शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह संदेश पारकर उपस्थित होते. पारकर यांच्या उपस्थितीवर भाष्य करताना उदय सामंत यांनी सूचक विधान केले. संदेश पारकर यांनी बैठकीत ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केले असेल, तर त्यातूनच सर्वांनी अर्थ समजून घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच ‘ऑपरेशन टायगर’बाबत सध्या बोलणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाची आठवण करून देत त्यांनी राजकीय संकेत दिले.

दरम्यान, या चर्चांवर संदेश पारकर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील सर्व नगराध्यक्षांना एका बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण बैठकीला गेलो होतो. कणकवली शहराचा विकास व्हावा, यासाठी सर्व नेत्यांना भेटत असतो, असे पारकर यांनी स्पष्ट केले.

योग्य वेळी योग्य निर्णय घेणार

नगराध्यक्ष झाल्यापासून शहरात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. आपण अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. प्रवेश करायचा झाल्यास तो जाहीरपणे सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. शहराच्या विकासासाठी भविष्यात काही निर्णय घ्यावे लागतील. भाजपमध्ये प्रवेश करायचा की शिंदे यांच्या शिवसेनेत, याचा निर्णय योग्य वेळी घेऊ, असे सूचक विधानही पारकर यांनी केले. त्यामुळे कोकणातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये काही मोठे बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर