मुख्य सामग्री पर जाएँ

कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्याची सुधीर मुनगंटीवारांची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पर्यावरणवाद्यांवरही निशाणा

स्थानिकांच्या रोजगार आणि हक्कांचा मुद्दा उपस्थित; ३१ हजार हेक्टर वनक्षेत्रातील अभयारण्याच्या निर्णयावरून राजकीय वादाची शक्यता

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्याची सुधीर मुनगंटीवारांची मागणी;
मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पर्यावरणवाद्यांवरही निशाणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्याच्या अस्तित्वावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. हे अभयारण्य रद्द करण्यात यावे, अशी मागणी माजी वनमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले आहे. तसेच पर्यावरणाच्या नावाखाली मुंबईत बसून निर्णय घेणाऱ्या तथाकथित पर्यावरणवाद्यांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा दावा

कन्हाळगाव अभयारण्याची घोषणा २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. सुमारे ३१ हजार हेक्टर वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश आहे. मात्र, या निर्णयामुळे जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या संधी आणि पारंपरिक हक्कांवर मर्यादा येऊ शकतात, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली आहे. स्थानिकांच्या हिताचा विचार न करता अभयारण्याची निर्मिती करण्यात आल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला आहे.

वनमंत्री असताना दिली नव्हती मान्यता

विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याचे वनमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांनी कन्हाळगाव अभयारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आणत त्यांनी अभयारण्य रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर

दुसरीकडे, कन्हाळगावचा जंगल परिसर वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा भाग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कावल व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्याघ्र भ्रमणमार्गाचा (टायगर कॉरिडॉर) भाग आहे. या परिसरात समृद्ध जैवविविधता असून सुमारे २२ ते ३२ वाघांचा वावर असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे एका बाजूला व्याघ्र संवर्धन आणि जंगल संरक्षणाचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांचे रोजगार, उपजीविका आणि पारंपरिक हक्क यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि कन्हाळगाव अभयारण्याबाबत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper