उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर दरोडा; ‘माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न’
७ ते ८ दरोडेखोरांचा पहाटे बंगल्यात शिरकाव; अडीच तोळे सोने आणि ८० हजारांची रोकड लंपास, एका संशयिताला ताब्यात
2 मिनट पठन

ठाणे, महाराष्ट्र मिरर – ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातील आगासन गावात उद्योजक तुकाराम सत्यवान मुंढे यांच्या बंगल्यावर भल्या पहाटे दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करून घरातील नोकरांना धमकावले. यावेळी चोरट्यांनी अडीच तोळे सोने आणि ८० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. मात्र, हा केवळ दरोडा नसून आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशानेच आरोपी आले होते, असा गंभीर आरोप उद्योजक तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
नावाच्या साधर्म्यामुळे संभ्रम
या घटनेनंतर सुरुवातीला प्रशासकीय अधिकारी आणि आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, दरोडा पडलेला बंगला हा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा नसून उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या घटनेची चर्चा अधिकच रंगली आहे.
‘माझ्यावर हल्ला करण्यासाठीच आले होते’
घटनेबाबत बोलताना तुकाराम मुंढे यांनी गंभीर आरोप केले. दरोडेखोर दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आपण गावातील काही लोकांना फोन करून मदतीसाठी बोलावले. फोन मिळताच गावकरी घटनास्थळी धावून आल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. आरोपींचा उद्देश केवळ चोरी करण्याचा नव्हता, तर आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाच होता, असा दावा त्यांनी केला आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद; पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेदरम्यान दरोडेखोर नोकराला धमकावत असल्याचा प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेच्या वेळी तुकाराम मुंढे आणि त्यांचे नोकर बंगल्यात झोपले होते. तर मुंढे कुटुंबातील इतर सदस्य देवदर्शनासाठी बाहेर गेल्याने या घटनेतून बचावले. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा चोरीच्या उद्देशाने घातलेला दरोडा होता की मुंढे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आखलेला कट होता, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

महाराष्ट्र मिरर
