मुख्य सामग्री पर जाएँ

‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेची मोठी कारवाई

रस्त्यावर राडारोडा टाकल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेची मोठी कारवाई
रस्त्यावर राडारोडा टाकल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागांवर बांधकामाचा राडारोडा आणि कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे.नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत राडारोडा हटविण्यात अपयश आल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी दिला आहे. दरम्यान, सार्वजनिक मार्गावर राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवल्याबद्दल ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम व्यावसायिका विरोधा पालिकेने मोठी कारवाई केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २३ मध्ये येणाऱ्या तपकिरी गल्ली, बुधवार पेठ येथे सार्वजनिक मार्गावर राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवल्याबद्दल ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम व्यावसायिकावर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २४) आरोग्य विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.

राडारोड्याची प्रशासनाने घेतली गंभीर दखल

तपकिरी गल्ली परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा राडारोडा नियमांचे उल्लंघन करून थेट सार्वजनिक रस्त्यावर टाकला जात असल्याची तक्रार आणि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. या राडारोड्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन पादचारी तसेच स्थानिक रहिवाशांच्या वाहतुकीस व दैनंदिन जीवनास त्रास होत होता. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवल्याची गंभीर दखल घेत महापालिकेने तत्काळ कारवाईचे पाऊल उचलले.

ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्र. ५ चे उपायुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या कारवाईदरम्यान वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्यासह चंद्रवदन गायकवाड, आरोग्य निरीक्षक तौसीफ देशपांडे, कृष्णा अवघडे आणि मोकादम प्रत्यक्ष उपस्थित होते. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून स्वच्छता नियमांच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक ती नोंद घेतली.

शहरात कठोर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार

शहरात राडारोडा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत पुणे महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या उल्लंघनांसाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार दंडात्मक तरतुदी लागू आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या साइटवरील राडारोडा व कचऱ्याची विल्हेवाट विहित नियमांनुसार आणि अधिकृत पद्धतीनेच लावणे बंधनकारक आहे. सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ किंवा मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे राडारोडा अथवा कचरा टाकून परिसरात अस्वच्छता पसरवल्यास किंवा सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्यास यापुढेही अशीच कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई सुरू राहील, असा इशारा कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

नागरिकांनीही आपल्या परिसरात कोठेही अनधिकृतपणे राडारोडा किंवा कचरा टाकला जात असल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला देऊन शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper