मुख्य सामग्री पर जाएँ

अलिबागमध्ये वाहतूक कोंडीने घेतला २० महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव

रुग्णवाहिका चार तास अडकली

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी

अलिबाग, महाराष्ट्र मिरर – रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्याने अवघ्या २० महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणगाव येथील आरांश सुशील ठाकूर हा चिमुकला सोमवारी दुपारी खेळत असताना त्याच्या घशात फुगा अडकला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली.

साधारण दीड तासांचे अंतर पार करण्यासाठी रुग्णवाहिकेला तब्बल चार तास लागले. दुपारी चारच्या सुमारास रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली. मात्र, तोपर्यंत उपचारासाठी उशीर झाला होता. डॉक्टरांनी आरांशला मृत घोषित केले. अवघ्या २० महिन्यांच्या चिमुरड्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बामणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतदेह घरी नेतानाही वाहतूक कोंडीचा सामना

या घटनेतील आणखी वेदनादायक बाब म्हणजे, चिमुरड्याचा मृतदेह घरी घेऊन जातानाही कुटुंबीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घरी पोहोचण्यासाठी त्यांना दोन तासांहून अधिक वेळ लागला. या प्रकारामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

ठेकेदार आणि प्रशासनावर कारवाईची मागणी

रस्त्याचे काम सुरू असताना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था का करण्यात आली नव्हती, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेची आणि आपत्कालीन सेवांची जबाबदारी प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

एका चिमुरड्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? रस्त्यांची कामे करताना वाहतुकीचे योग्य नियोजन आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरत आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर