मुख्य सामग्री पर जाएँ

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट; बिष्णोई गँगशी कनेक्शन, दोघांना अटक

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ठाण्यातून दीपक सिंह, तर दिल्लीतून विकास ठाकूरला अटक, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनट पठन

अमिताभ बच्चन

मुंबई : महाराष्ट्र मिरर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दीपक सिंह ऊर्फ दीप याला ठाण्यातून, तर विकास ठाकूर ऊर्फ विकी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. या कटामागे कुख्यात बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तींचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर रेकी करून गोळीबार करण्याची जबाबदारी दीपक सिंह याच्यावर सोपवण्यात आल्याचा संशय आहे. या कटाचा संबंध १९८४ मधील शीखविरोधी दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कथित वक्तव्याशी जोडला जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या कटामागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण आहेत, याचा तपास अद्याप सुरू आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी विकास ठाकूर याचे बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो यापूर्वी अनमोल बिष्णोई याच्यासाठी काम करत होता आणि त्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. अनमोल बिष्णोईला भारतात आणल्यानंतर तपास यंत्रणांनी त्याच्याविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर विकास ठाकूर याने टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी अनिल पंडित याच्यासाठी काम करण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह बॉलिवूडमधील काही कलाकार पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली होती. दिल्लीतील एका उद्योजकावर गोळीबार करण्याचाही कट रचण्यात आल्याचा संशय आहे. या दोन्ही संभाव्य घटनांची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून आरोपींना अटक केली.

गँगस्टरकडून सेलिब्रिटींना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कटामागील सूत्रधार कोण, आरोपींना शस्त्रे कोठून मिळणार होती आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर