अमरावतीतील नवजात अर्भक विक्री प्रकरणाला मोठे वळण
२४ दिवसांपासून फरार असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला अटक
1 मिनट पठन

अमरावती : संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडवून देणाऱ्या नवजात अर्भक विक्री प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २४ दिवसांपासून फरार असलेले डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांना अखेर अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील साईनगर-अकोली परिसरातून या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली होती. या प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाची परस्पर दुसऱ्या व्यक्तीला ३ लाख ५० हजार रुपयांना विक्री केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर आणि त्यांच्या पतीवर करण्यात आला आहे.
वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांनी प्रकरण आणले उघडकीस
नवजात अर्भकाच्या कथित विक्रीचा हा गंभीर प्रकार शिवसेना (शिंदे गट) नेत्या वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांनी उघडकीस आणला होता. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्यानंतर डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने हे दोघेही फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर २४ दिवसांनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यात यश मिळवले.
दरम्यान, या अटकेनंतर नवजात अर्भकाच्या कथित विक्री प्रकरणातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या व्यवहारामागे नेमके कोणते धागेदोरे आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
