मुख्य सामग्री पर जाएँ

अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही नावे जाहीर करा!

भाजप कार्यकर्ते रवींद्र साळेगावकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही नावे जाहीर करा!
भाजप कार्यकर्ते रवींद्र साळेगावकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या किंवा कारवाई थांबविण्यासाठी फोन करणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करण्याचा आयुक्तांचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ही अतिक्रमणे फोफावली, त्यांचीही नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते रवींद्र साळेगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सध्या आक्रमक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर साळेगावकर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासनातील जबाबदारीचा मुद्दा अधोरेखित केला आहे. अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे अभिनंदन केले, मात्र त्याच वेळी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी त्यांची नावे जाहीर करण्याचा निर्णय योग्यच आहे. परंतु शहरातील रस्ते व पदपथांवर अतिक्रमणे उभी राहत असताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षक नेमके काय करत होते?’ असा थेट सवाल साळेगावकर यांनी केला आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अतिक्रमणांची इत्यंभूत माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असते. विशेषतः अतिक्रमण निरीक्षक दररोज आपल्या कार्यक्षेत्रात फिरत असल्याने कोणत्या भागात नवीन अतिक्रमण झाले आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना असते. असे असतानाही काही अधिकारी आणि कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अतिक्रमण झाल्यानंतर ते हटविण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यापेक्षा, ते मुळात निर्माणच होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर नियमित देखरेख आणि प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. अतिक्रमणे वाढत असताना त्यांना वेळीच आळा घातला जात नसेल, तर त्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले पाहिजे. पुणे महापालिकेच्या ज्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आढळून येतील, तेथील अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी. या चौकशीत कर्तव्यात कसूर केल्याचे किंवा अतिक्रमणांना पाठीशी घातल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर निलंबनासारखी कठोर कारवाई करून त्यांची नावेही नागरिकांसमोर जाहीर करावीत, अशी मागणी साळेगावकर यांनी केली आहे.

अतिक्रमण कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच अतिक्रमणे वाढू देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने स्वतःच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली, तरच पुणे शहर खऱ्या अर्थाने अतिक्रमणमुक्त होण्यास मदत होईल.

- रवींद्र साळेगावकर, नगरसेवक

लोकप्रतिनिधींपाठोपाठ आता प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आयुक्त नवल किशोर राम या मागणीची दखल घेऊन दोषी क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper