मुख्य सामग्री पर जाएँ

अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर;कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक

नऊ महिने उलटूनही चौकशीचा अहवाल आणि अपघातामागील सत्य जाहीर नसल्याचा दावा

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक

पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके सत्य जनतेसमोर यावे आणि संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून पक्षाने सरकार आणि तपास यंत्रणांकडे प्रलंबित प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकारातून हे फलक लावण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूला नऊ महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती, चौकशीचा अंतिम अहवाल आणि अपघातामागील नेमकी कारणे याबाबत स्पष्ट माहिती जनतेसमोर आलेली नसल्याचा दावा या फलकांवर करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणात नेमकी कोणती चौकशी सुरू आहे, तपासात आतापर्यंत काय निष्पन्न झाले आणि अंतिम निष्कर्ष कधी जाहीर होणार, असे प्रश्न फलकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सत्य समोर येणे आवश्यक असून, जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असल्याची भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आहे.

आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणासंदर्भात वेळोवेळी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी मांडलेले प्रश्न आणि शंका यांची योग्य पद्धतीने चौकशी होऊन त्यांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी या फलकांमधून करण्यात आली आहे. हा विषय केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित नसून सत्यशोधन आणि न्याय मिळवून देण्याशी संबंधित असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार?’ असा थेट सवाल या फलकांवर उपस्थित करण्यात आला आहे. तसेच ‘अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे. कोथरूडमधील विविध भागांत लावलेल्या या फलकांमुळे अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा विषय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, चौकशीचा अहवाल कधी जाहीर होणार आणि जनतेच्या मनातील प्रश्नांना अधिकृत उत्तरे कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने फलकांच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या या मागणीवर संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper