
Mumbai Local Sunday MegaBlock Latest News : विद्याविहार-ठाणे दरम्यान मुख्य मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकलवर परिणाम
मुंबई :- मध्य रेल्वेच्या मुंबई Central Mumbai Train विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी या रविवारी (19 ऑक्टोबर 2025) मोठा ‘मेगा ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा ब्लॉक घेतल्यामुळे मुंबईत खरेदीसाठी येणाऱ्या आणि उपनगरीय प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना लोकल सेवेच्या विस्कळीतपणामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीमुळे पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. Mumbai Local Train Latest News
मुख्य मार्गावर परिणाम
मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 8.00 ते दुपारी 1.30 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लांबपल्ल्याच्या सर्व रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावरून धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील सेवा बंद
हार्बर मार्गावर सीएसएमटी आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.00 ते दुपारी 4.40 दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत बंद राहील. तसेच, सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या लोकल सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 दरम्यान बंद राहतील.
त्याचप्रमाणे, पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी 9.53 पासून ते दुपारी 3.20 पर्यंत उपलब्ध नसतील आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.45 पासून ते सायंकाळी 5.13 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला स्थानकांदरम्यान प्रवाशांसाठी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


