મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

रांजणगाव एमआयडीसीत कामगाराची ‘ॲक्टिव्हा’ हिसकावली

विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात संशयितांनी चोरली दुचाकी

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

रांजणगाव एमआयडीसीत कामगाराची ‘ॲक्टिव्हा’ हिसकावली

विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात संशयितांनी चोरली दुचाकी

पुणे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात भरदिवसा जबरी चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. पेप्सीको कंपनीसमोर विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात तरुणांनी एका मजुराला थांबवून त्याची ५० हजार रुपये किमतीची ‘ॲक्टिव्हा’ गाडी जबरदस्तीने हिसकावून नेली. शनिवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

प्रियांशू लखनलाल केसरी (वय २१, धंदा फूड स्टॉल, सध्या रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींचे वय १८ ते २२ वर्षे
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियांशू हा शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आपल्या ॲक्टिव्हा गाडीवरून (क्रमांक एमएच १२ झेड के ५१३०) पेप्सीको कंपनीसमोरील रस्त्यावरून जात होता. यावेळी एका विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून चार तरुण तिथे आले. आरोपींचे वय १८ ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. त्यापैकी दोघांनी निळे टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती, तर इतर दोघांनी चॉकलेटी रंगाचे शर्ट आणि काळी पँट घातली होती.

जबरदस्तीने पळवली गाडी
या चोरट्यांनी प्रियांशूला रस्त्यात अडवले आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून वेगाने पळ काढला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे एमआयडीसी परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी हाती लागले नाहीत. सहायक फौजदार शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.

શેર કરો