शिक्षण आणि लग्नाचे आमिष दाखवून महिलेला २६ लाखांना लुबाडले
तोतया ‘इस्रो’ शास्त्रज्ञाचा येरवडा पोलिसांकडून अटक
2 મિનિટ વાંચન

तोतया ‘इस्रो’ शास्त्रज्ञाचा येरवडा पोलिसांकडून अटक
पुणे: मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर स्वतःला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका महिलेला २६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत भामट्याचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर आणि जयेश पाटील अशा विविध नावांनी बनावट प्रोफाईल तयार करून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातून फसवणुकीची २१ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवले असून, या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेमुळे मॅट्रोमोनिअल फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मॅट्रोमोनिअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क
या प्रकरणातील फिर्यादी महिलेशी आरोपीने मॅट्रोमोनिअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधला होता. स्वतः शास्त्रज्ञ असल्याचे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचे खोटे आश्वासन देऊन लग्नाची मागणी घातली. आरोपीने फिर्यादींना विविध कारणांसाठी बँकेतून कर्ज घेण्यास भाग पाडून त्यांची २६ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी १० जानेवारी २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते.
संशयित मुंबईतील एका गुन्ह्यात अटकेत होता
तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी आदर्श म्हात्रे याला नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका अन्य गुन्ह्यात अटक केली आहे. त्यानंतर येरवडा पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन रबाळे पोलिसांकडून आरोपीचा ताबा मिळवला आणि १५ एप्रिल २०२६ रोजी त्याला या गुन्ह्यात अधिकृतपणे अटक केली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आरोपीने फसवणुकीसाठी वापरलेल्या बँक खात्यामध्ये २१ लाख रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचे आढळून आले, जी पोलिसांनी तातडीने हस्तगत केली आहे. या सराईत गुन्हेगाराने अशाच पद्धतीने इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर ओळख झालेल्या व्यक्तींना कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी किंवा त्यांच्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय व्यवहार करू नये, असे आवाहन येरवडा पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना केले आहे.
Woman duped of Rs 2.6 lakhs by promising education and marriage
