મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Vijay Wadettiwar : "राजीनामा दिला तरी माज उतरलेला नाही!"; वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर घणाघात, वर्षा गायकवाडांनीही ओढले ताशेरे

Vijay Wadettiwar On Rupali Chakankar : खरात प्रकरणात चाकणकर केवळ 'छोटा मासा'; खऱ्या सूत्रधारांचा शोध घेण्याची विरोधकांची मागणी, राजकीय वातावरण तापले

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Vijay Wadettiwar : "राजीनामा दिला तरी माज उतरलेला नाही!"; वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर घणाघात, वर्षा गायकवाडांनीही ओढले ताशेरे

Vijay Wadettiwar On Rupali Chakankar : खरात प्रकरणात चाकणकर केवळ 'छोटा मासा'; खऱ्या सूत्रधारांचा शोध घेण्याची विरोधकांची मागणी, राजकीय वातावरण तापले

मुंबई :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात Ashok Kharat याच्या सेक्स स्कँडल प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी उशिरा रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, या राजीनाम्यानंतरही विरोधकांचा संताप शांत झालेला नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि राजीनाम्यातील भाषेवर बोचरी टीका केली आहे.

"सर्वात अकार्यक्षम अध्यक्षा!"; विजय वडेट्टीवारांची टीका

विजय वडेट्टीवार यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना म्हटले की, "राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!

स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे!
म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला दबाव ,या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद,चूक झाली अस त्यांना वाटत नाही!

राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे!

रूपाली चाकणकर हा छोटा मासा आहे यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला,वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे

हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी,मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," अशी मागणी त्यांनी केली.

"राजीनामा देऊन प्रकरण संपणार नाही" - वर्षा गायकवाड

मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनीही चाकणकरांवर निशाणा साधला.

"महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना अडचणीत आणण्याचे काम चाकणकरांनी केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावरच त्यांना हा राजीनामा द्यावा लागला, हे स्पष्ट आहे. केवळ राजीनामा घेऊन हे प्रकरण मिटणार नाही; खरातला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, तरच पीडितांना न्याय मिळेल," असे गायकवाड म्हणाल्या.

चाकणकरांचे प्रत्युत्तर आणि कायदेशीर इशारा

दुसरीकडे, राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अशोक खरातबद्दल: "खरातचे हे विकृत रूप मला माहित नव्हते. तपासातून सर्व सत्य बाहेर येईल," असे त्या म्हणाल्या.बोट कापल्याची अफवा: "मी माझे कोणतेही बोट कापलेले नाही, या निव्वळ अफवा आहेत."

3 सुषमा अंधारेंना नोटीस: 20 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करणाऱ्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

तपासाचे चक्र वेगाने

अशोक खरातला 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी जप्त केलेल्या 58 अश्लील व्हिडिओंमुळे अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

શેર કરો