Uddhav Thackeray: “भाजपाला आता आम्ही फेकून देणार” – वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा आक्रमक इशारा
Uddhav Thackeray On BJP : “अंतरपाट हटला, आता आम्ही एकत्र आलो आहोत – कायम राहण्यासाठी”
1 મિનિટ વાંચન

Uddhav Thackeray On BJP : “अंतरपाट हटला, आता आम्ही एकत्र आलो आहोत – कायम राहण्यासाठी”
मुंबई | राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेने आज (5 जुलै) मुंबईत वरळीतील 'डोम' मैदानावर विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर दिसले, आणि दोघांच्या भाषणांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका करत थेट इशाराच दिला – "आता आम्ही तुम्हाला फेकून देणार आहोत!"
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. राजने अप्रतिम भाषण केलं आहे. आमच्यातील जो अंतरपाट होता, तो अनाजीपंतांनी दूर केला. आता आम्ही दोघं एकत्र आलो आहोत ते एकत्रच राहण्यासाठी.” यावेळी त्यांनी राज ठाकरेचा उल्लेख ‘सन्माननीय राज ठाकरे’ असा करून स्नेहभाव व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी काही बाबतींत अप्रत्यक्षपणे अंधश्रद्धेवर आणि राजकीय सुळसुळाटावरही प्रहार केला. “आज अनेक बुवा, महाराज गावी जाऊन अंगारे, धुपारे करत असतील. काही जण टाचण्या मारत असतील. त्यांना सांगतो – आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी अशा बोंदूपणाविरोधात लढा दिला होता. आज त्यांचे नातू तुमच्या समोर ठामपणे उभे आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
भाषा हे केवळ वरवरचं प्रकरण नसून संस्कृती आणि अस्मितेचा भाग असल्याचं स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघांनीही भाजपाचा अनुभव घेतलाय. ते लोक वापरून फेकून देतात. पण आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला (भाजपाला) फेकून देणार आहोत.” यासोबतच त्यांनी भाजपावर अफवांचा कारखाना चालवतो, असा आरोप करत म्हटलं, “ते म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. पण आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्व म्हणजे गोंधळ नाही, तो संयम आणि विचारांचा मार्ग आहे.”उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र व्यासपीठावर येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीची शक्यता अधिक बळावली आहे. मराठी अस्मिता, भाषा, आणि हिंदुत्व यावर आधारित ही जोपासलेली एकजूट आगामी निवडणुकांपूर्वी एक नवा समीकरण तयार करू शकते.
