महात्मा फुले यांच्या विचारांना विरोधकांकडून तिलांजली
फडणवीस यांची टीका
1 મિનિટ વાંચન

फडणवीस यांची टीका

मुंबई : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी महिला सहभागाचा गळा घोटला आहे. ही एका अर्थाने महिला विधेयकाची 'भ्रूणहत्या' आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केले आहे. जनमताच्या रेट्याने महिलाच आता या विरोधकांचे चेहरे उघडे पाडतील आणि त्यांना वठणीवर आणतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न होऊ शकल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत. यावेळी नीलम गोऱ्हे, चित्रा वाघ, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, १७ एप्रिल हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इतिहासात सुवर्णक्षण ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, डीएमके, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि महाराष्ट्रातील मविआच्या घटक पक्षांनी आपली महिलाविरोधी मानसिकता पुन्हा एकदा दाखवून दिली. विधेयक फेटाळल्यानंतर विरोधकांनी केलेला आनंदोत्सव हा समाजसुधारकांच्या विचारांवर केलेला तांडव होता. या पक्षांनी केवळ शब्दांतच नव्हे, तर कृतीतून महिलांचा द्वेष प्रकट केला आहे.
२०२९ मध्ये आरक्षण लागू होणारच
विधेयकाच्या तांत्रिक बाबी स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, १९७१ च्या लोकसंख्येनुसार सध्याच्या जागा निश्चित आहेत. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जागावाटपाचे फेरलोट आवश्यक आहे. २०२३ च्या संविधान संशोधनानुसार, जनगणनेनंतर आणि जागांच्या पुनर्रचनेनंतर २०२९ मध्ये महिला आरक्षण पूर्णपणे लागू होईल, हे निश्चित आहे. उत्तर आणि दक्षिण भारताचा समतोल राखत हे आरक्षण आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता, मात्र विरोधकांनी त्यात खोडा घातला.
भाजपने राजस्तान, गुजरात, दिल्ली अशा अनेक राज्यांत महिला मुख्यमंत्री दिल्या. पण विरोधकांनी नेहमीच महिलांना दुय्यम स्थान दिले. या विषयावर माझ्या स्तरावरील कोणत्याही विरोधी नेत्याने माझ्याशी खुली चर्चा करावी, हे माझे चॅलेंज आहे. पण ते चर्चेला येणार नाहीत, ते नेहमीप्रमाणे पळून जातील, असे आव्हानही फडणवीस यांनी यावेळी दिले.
Opposition pays tribute to Mahatma Phule's thoughts
