Traffic Signal News : 'स्मार्ट' सिग्नल यंत्रणेवरील ११५ कोटी पाण्यात; पुणेकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी कायम
पुणे, महाराष्ट्र मिरर Traffic Signal News : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठ्या गाजावाजात राबविण्यात आलेल्या ‘अॅडॅप्टिक ट्रॅफिक मैनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) प्रकल्पावर भांडवली खर्च आणि देखभाल-दुरुस्तीसह आतापर्यंत तब्बल ११५ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
1 મિનિટ વાંચન

पुणे, महाराष्ट्र मिरर Traffic Signal News : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठ्या गाजावाजात राबविण्यात आलेल्या ‘अॅडॅप्टिक ट्रॅफिक मैनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) प्रकल्पावर भांडवली खर्च आणि देखभाल-दुरुस्तीसह आतापर्यंत तब्बल ११५ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या खर्चानंतरही पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळालेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उलट प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम असल्याने कोट्यवधींच्या या यंत्रणेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.Traffic Signal News

पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. प्रशासनाने दिलेल्या प्रकल्पाच्या माहितीनुसार, सेवा करारातील त्रुटी आणि यंत्रणेच्या ‘अपटाईम डाउनटाईम’ निकषांमध्ये झालेल्या त्रुटीमुळे संबंधित ठेकेदाराकडून ७४ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे
अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने १० जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. ६९ महिन्यांच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत चार ‘रनिंग बिलां’ पोटी ९८ कोटी ६२
लाख रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर २२ एप्रिल २०२४ रोजी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच तिमाहींच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणखी १७ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले.
१२५ चौकांसाठी १०२ कोटी रुपये खर्च झाल्याने प्रत्येक सिग्नलसाठी ८१ लाख रुपये खर्च झाल्याचा आरोप प्रशासनाने फेटाळला आहे, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मूळ भांडवली निविदेची रक्कम १०२ कोटी ६२ लाख रुपये होती. प्रत्यक्ष एटीएमएस सिग्नलसाठी ५८ कोटी ७५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक चौकातील सिग्नलचा सरासरी खर्च ४७ लाख रुपये इतकाच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
