Tikona fort: तिकोना गडावर पुण्यातील महिला पर्यटकाचा भीषण अपघात
पायऱ्यांवरून घसरून डोक्याला, मणक्याला गंभीर दुखापत
2 મિનિટ વાંચન

Tikona fortपुणे : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तिकोना गडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील एका महिला पर्यटकाचा पायऱ्यांवरून घसरून गंभीर अपघात झाला. गडाच्या बालेकिल्ल्यावरून खाली उतरत असताना पाय घसरल्याने ३८ वर्षीय महिलेला डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली. शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) दुपारी ही घटना घडली. स्थानिक दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी आणि अन्य पर्यटकांच्या मदतीने जखमी महिलेला झोळीतून गडाखाली आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकी घटना काय?
मनीषा जगन्नाथ ढमाले (वय ३८, रा. दत्तवाडी, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास तिकोना गडावर पर्यटनासाठी आल्या होत्या. गडावरील बालेकिल्ला आणि त्याखालील दरवाजा यांच्यामधील खडतर पायऱ्यांवरून त्या खाली उतरत होत्या. याचवेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मणक्यालाही मार लागला आहे.
पर्यटक आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे किल्लेदार सुजित मोहोळ यांनी तिकोना पेठ गावचे पोलीस पाटील अनंता खैरे यांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधला.
दरम्यान, गडावरील अन्य पर्यटकांच्या मदतीने जखमी मनीषा ढमाले यांना झोळीच्या साहाय्याने गडाखाली आणण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या १०८ रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पवनानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे किल्लेदार सुजित मोहोळ यांनी या घटनेची माहिती दिली.
गड-किल्ल्यांवर पर्यटन करताना काळजी घ्या!
गड-किल्ल्यांवर पर्यटन किंवा दुर्गभ्रमंती करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः खडतर पायऱ्या, निसरड्या वाटा आणि उंच कड्यांच्या परिसरात चालताना योग्य पादत्राणे वापरणे, घाई न करणे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. निसर्गाचा आणि ऐतिहासिक वास्तूंचा आनंद घेताना स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

મહારાષ્ટ્ર મિરર

