મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

चंदननगरमध्ये 'पीजी’त चोरी

उघड्या दरवाजावाटे शिरून १.६३ लाखांचे लॅपटॉप लंपास

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

चंदननगरमध्ये 'पीजी’त चोरी

उघड्या दरवाजावाटे शिरून १.६३ लाखांचे लॅपटॉप लंपास

पुणे: चंदननगर परिसरातील एका ‘पेईंग गेस्ट’ (पीजी) निवासस्थानात शिरून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. सदनिकेचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे पाहून चोरट्याने आत प्रवेश केला आणि १ लाख ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंदननगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ आणि ३०५ (अ) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) पहाटे ४:३० ते सकाळी ८:३० या वेळेत घडली.

उघड्या दरवाजाचा साधला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण चंदननगरमधील शेजवळ पार्क, गल्ली क्रमांक ९ येथील 'एस.एस. ब्रदर्स पीजी’मध्ये राहतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.

लॅपटॉप आणि हेडफोन गायब
चोरट्याने घरातील फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचे एकूण १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, चार्जर आणि महागडे हेडफोन चोरून नेले. सकाळी जेव्हा फिर्यादीला जाग आली, तेव्हा घरातील सामान चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने चंदननगर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली.

परिसरात भीतीचे वातावरण
आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था जवळ असल्याने चंदननगर परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुण 'पीजी’मध्ये राहतात. मात्र, अशा प्रकारे भरवस्तीत आणि घराचा दरवाजा उघडा असताना झालेल्या चोरीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून चोरट्याचा माग काढत आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

શેર કરો