મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी

दानपेटीसह सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर’ही लंपास

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी

दानपेटीसह सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर’ही लंपास

पुणे: राजगुरूनगर येथील राक्षेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दोन दानपेट्यांमधील रोख रकमेसह चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर (DVR) असा एकूण १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर मंदिराच्या पुजारी सौ. सुनीता दत्तात्रेय गुरव (वय ३६, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही चोरी रविवारी (ता. १९) सकाळी १० ते सोमवारी (ता. २०) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. रविवारी नेहमी प्रमाणे पूजेचे कामकाज आटोपल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेले अंदाजे ४ हजार रुपये (नोटा आणि चिल्लर) चोरून नेले. विशेष म्हणजे, आपली ओळख पटू नये आणि चोरीचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागू नये, या उद्देशाने चोरट्यांनी ९ हजार ५०० रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर संचही चोरून नेला. सोमवारी पहाटे पुजारी मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आला.

खेड पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (आय) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धार्मिक स्थळांवर होणाऱ्या या चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी परिसरात गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Theft at Siddheshwar temple in Rajgurunagar

શેર કરો