MPSC Exam Newsएमपीएससीची ऑनलाइन परिक्षा होणार नाही
मुंबई, महाराष्ट्र मिरर MPSC News : एमपीएससी परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
1 મિનિટ વાંચન

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन ; विद्यार्थ्यांचा मोर्चा स्थगित
मुंबई, महाराष्ट्र मिरर MPSC News : एमपीएससी परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक पोलीस प्रशासनाने आयोजित केली होती. यावेळी ऑनलाइन परीक्षा लागू न करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे १७ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा प्रस्तावित मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी कळवले आहे.MPSC Exam News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर त्यानी एमपीएससी अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून सध्याच्या परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा लागू न करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. भविष्यात ऑनलाइन परीक्षा घ्यायच्या झाल्यास राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा एकाच पद्धतीने घेता येईल, अशी सक्षम यंत्रणा उभी केल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, १७ जुलैपर्यंत सुरू असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा ‘गट क’ अर्ज भरण्याच्या मुदतीबाबतही पुनर्विचार केला जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर ऑनलाइन परीक्षेचा निर्णय सध्या स्थगित राहील, असा विश्वास विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे १७ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा प्रस्तावित मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींशी पुन्हा चर्चा होणार असून त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थी प्रतिनिधींनी ही बैठक आयोजित केल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानले. तसेच, आमदार अभिमन्यू पवार, राजेश पांडे आणि राज देशमुख यांनीही बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू प्रभावीपणे मांडल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
