विकास लवांडे यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवर कारवाई करा
जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन
1 મિનિટ વાંચન

जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन
"काही टवाळखोर प्रवृत्ती वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन समाजात हिंसा आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे." - श्रीकांत पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
निलेश राऊत
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्यांच्यावर शाई फेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सोमवार (ता. ११) करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विकास लवांडे यांची विचारपूस केली तसेच त्यांचा दूध अभिषेक करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी बोलताना श्रीकांत पाटील म्हणाले, "वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांचा आणि शांततेचा मार्ग दाखवणारा आहे. वारकरी संप्रदाय कधीही काळ्या रंगाचा वापर करणार नाही, कारण काळा रंग हा आमच्या विठुराय माऊलीचा रंग आहे. काही टवाळखोर प्रवृत्ती वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन समाजात हिंसा आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.
"पुणे शहर हे सांस्कृतिक परंपरा, संत विचार आणि वारकरी संप्रदायाची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. देहू-आळंदीच्या पवित्र परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुण्यनगरीत काही प्रवृत्तींकडून हिंसक प्रकार घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
"हा संघर्ष विचारांचा असून तो लोकशाही मार्गाने आणि विचारांनीच लढला गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र काही व्यक्ती जाणूनबुजून हिंसाचाराला खतपाणी घालून वारकरी संप्रदायालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्ती आम्ही यापुढे सहन करणार नाही."
संबंधितावर कारवाई करण्याचे पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पक्षाच्या वतीने देण्यात आले.
भाजपचे मंत्री निलेश राणे, आमदार संग्राम जगताप, महेश लांडगे यांनी या घटनेचा धिक्कार करण्याऐवजी गुंडांना प्रोत्साहन करणारी वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे सामाजिक जीवन असुरक्षित झाले आहे. तरी या घटनेतील गुंडावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
