प्रसिद्ध व्यावसायिक अशोक जैन यांचा संशयास्पद मृत्यू
आपटे रोडवरील पंचतारांकित हॉटेलात घडली घटना
1 મિનિટ વાંચન

आपटे रोडवरील पंचतारांकित हॉटेलात घडली घटना
पुणे: शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अशोक मिलापचंद जैन यांचा आपटे रोड परिसरातील कोरोनेट पुणे या हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, या घटनेमुळे पुण्यातील उद्योग व व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे.
अशोक जैन (रा. सॅलेसबरी पार्क) हे पुण्यातील व्यावसायिक क्षेत्रातील परिचित नाव मानले जात होते. प्रचित डेव्हलपर्स व अनेक व्यावसायिक फर्ममध्ये त्यांची भागीदारी असल्याचे समोर येत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर व्यावसायिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
