दादोजी कोंडदेव व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी
सकल ब्राम्हण समाजाची मागणी; महापौरांना दिले निवेदन
1 મિનિટ વાંચન

सकल ब्राम्हण समाजाची मागणी; महापौरांना दिले निवेदन
निलेश राऊत
पुणे: सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला होता. लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी मागणी सकल ब्राम्हण समाच्यावतीने महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी मागणीही करण्यात आहे.
पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत. पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथी निमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती असल्याचे समन्वयक संदीप खर्डेकर, भालचंद्र कुलकर्णी यांनी निवेदनात कळविले आहे.
