મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड!

Shashikant Shinde Latest News : जयंत पाटील यांनी सात वर्षांनंतर दिला राजीनामा; नेतृत्वाचा बोट शिंदेंकडे

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड!

Shashikant Shinde Latest News : जयंत पाटील यांनी सात वर्षांनंतर दिला राजीनामा; नेतृत्वाचा बोट शिंदेंकडे

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेतृत्वबदलावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर एकमताने आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या निर्णयामुळे जयंत पाटील Jayant Patil यांच्या राजीनाम्याभोवती गेल्या चार दिवसांपासून असलेला संभ्रम संपुष्टात आला आहे. या नव्या निवडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नेतृत्व आणि पक्ष संघटन बांधणीचं मोठं दायित्व आता शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर येऊन ठेपलं आहे.

पवारांशी जिवाभावाचं नातं

शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या कट्टर विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. पक्षाच्या स्थापनेपासूनच ते पवारांसोबत असून, 2022 मधील पक्षफोडीतही त्यांनी निष्ठा कायम ठेवली. त्यांना संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव असून पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांची निवड ही पक्षाला एकसंघ ठेवण्याच्या दिशेने मोठं पाऊल मानली जात आहे, कारण अलीकडेच शरद पवार गटातील अनेक नेते सत्ताधारी महायुतीकडे झुकताना दिसले आहेत.

जयंत पाटील यांचा अल्पविराम राजीनामा देताना जयंत पाटील म्हणाले,

"मी पक्षाच्या नेतृत्वापासून दूर जाणार नाही. प्रदेशाध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी असतो. मात्र, मला पवार साहेबांनी सात वर्षं संधी दिली. आता बाजूला होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे."गेल्या सात वर्षांत त्यांनी पक्षाला अनेक वळणांवर सांभाळलं. आता त्यांनी शांततेने उत्तरदायित्व शिंदेंकडे सोपवलं आहे.

शशिकांत शिंदे कोण आहेत?

मूळ गाव: हुमगाव, ता. जावळी, जि. सातारा

शिक्षण: वाणिज्य शाखेचे पदवीधर

सामाजिक ओळख: माथाडी कामगार चळवळीतील प्रभावी नेतृत्व

राजकीय कारकीर्द:

1999 – प्रथमच जावळी मतदारसंघातून आमदार

2009 ते 2014 – कोरेगावचे आमदार (शालिनी पाटील यांचा पराभव)

माजी जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे प्रकल्प)

2019 – पराभवानंतरही पवार गटात सक्रीय

सध्या विधान परिषद सदस्य व शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद.

आगामी आव्हाने – संघटना व निवडणुका

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिंदेंपुढे पक्ष संघटन मजबूत करण्याचं, निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याचं मोठं आव्हान आहे. अलीकडील पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर हे काम अधिक कठीण ठरणार आहे.

શેર કરો