आंबेगाव बुद्रुक येथे ज्येष्ठ नागरिकाचा ५० हजारांचा मोबाईल लंपास
गर्दीचा फायदा घेत चोरट्याने केला हातसाफ
1 મિનિટ વાંચન

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने केला हातसाफ
पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर चौक परिसरात मासे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या शर्टच्या खिशातील मोबाईल फोन गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर चौक ते राजमाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या भुयारी मार्गाजवळ मासे खरेदी करत होते. त्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. खरेदी आटोपल्यानंतर मोबाईल गायब झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र मोबाईल न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या सराईत चोरट्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
