Sabha Raut : शिवसेनेच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदींची नाराजी? संजय राऊतांनी एका वाक्यात झटकल्या अफवा
Sanjay Raut On Priyanka Chaturvedi : "पक्षाच्या स्थापनेपासून मी इथेच आहे"; राज्यसभेच्या जागेवरून झालेल्या वादावर राऊतांनी सोडले मौन
2 મિનિટ વાંચન

Sanjay Raut On Priyanka Chaturvedi : "पक्षाच्या स्थापनेपासून मी इथेच आहे"; राज्यसभेच्या जागेवरून झालेल्या वादावर राऊतांनी सोडले मौन
मुंबई :- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल पार पडलेल्या शिवसेना (ठाकरे) खासदारांच्या बैठकीत मोठे नाट्य घडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेची हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सोडल्यामुळे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
प्रियंका चतुर्वेदींची 'ती' नाराजी आणि राऊतांचे उत्तर
सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेची जागा मित्रपक्षाला सोडण्यावरून संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधला होता. मात्र, राऊतांनी आज या सर्व बातम्यांना 'अफवा' ठरवले. ते म्हणाले, "आम्ही विचार करून काम केले नसते, तर पक्ष इतका मोठा झाला नसता. अशा प्रकारचं काहीही घडलेलं नाही. मी इतकंच सांगेन की, या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून मी याच पक्षात आहे." या एका वाक्यात त्यांनी अंतर्गत वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
"अशोक खरात तपासावर आता संशय नको"
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून रोज होणाऱ्या चिखलफेकीवर राऊतांनी सावध पवित्रा घेतला. "आता मुख्यमंत्री आणि पोलिसांना शांतपणे काम करू द्यावे. रोज या विषयावर चर्चा करून देश आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही," असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील राजकीय कलगीतुरा थांबवण्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादावर मौन
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत, त्याबाबत विचारले असता राऊतांनी भाष्य करणे टाळले. "शिवसेना म्हणून आम्ही यावर प्रतिक्रिया देण्याचे काहीच कारण नाही," असे उत्तर त्यांनी दिले.
"पंतप्रधान नसतील, तर सर्वपक्षीय बैठकीला अर्थ नाही"
आखाती युद्धाच्या (पश्चिम आशिया संघर्ष) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर राऊतांनी टीकास्त्र सोडले. "जर त्या बैठकीला पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणार नसतील, तर अशा बैठकीला काहीही अर्थ नाही. पंतप्रधान येणार नसतील, तर आम्ही अशा बैठकीला जाणे टाळायला हवे होते," असा टोला त्यांनी लगावला.
