यवतमध्ये भांडण सोडवणे बेतले जिवावर
पान टपरी चालकावर तलवारीने जीवघेणा हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
2 મિનિટ વાંચન

पान टपरी चालकावर तलवारीने जीवघेणा हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
पुणे: दौंड तालुक्यातील यवत येथे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दुकानासमोर चाललेले भांडण थांबवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून, तिघांनी पान टपरी चालकावर तलवारीने हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर पळून जाणाऱ्या फिर्यादीच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण नंदु दोरगे (वय २८, धंदा पान शॉप, रा. यवत, ता. दौंड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी यश दिपक मोहिते (रा. बारामती), अनिकेत केशवकुमार नामदास (रा. भवानीनगर, इंदापूर) आणि एका अनोळखी वाहनचालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) सह भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ४) रात्री सव्वा दहाच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गालगत असलेल्या ऑस्करवाडी मिसळजवळ प्रविण दोरगे आपल्या पान शॉपमध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर काही लोक आपसात भांडण करत होते. प्रविण यांनी त्यांना “आपसात भांडणतंटा करू नका,” असे म्हणून तिथून जाण्यास सांगितले. त्यावेळी ते लोक तिथून निघून गेले, मात्र त्याचा राग त्यांनी मनात धरला.
तलवारीने हल्ला आणि गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न
काही वेळाने आरोपी यश मोहिते आणि अनिकेत नामदास हे एका अनोळखी चालकासह तिथे परत आले. “तू आमच्या भांडणात मध्यस्थी करायला का आलास?” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी यश मोहिते याने “मी तुला आज जिवंत सोडत नाही,” असे ओरडून प्रविण यांच्या गळ्यावर तलवारीने वार केला. प्रविण यांनी प्रसंगावधान राखून वार हुकवल्याने तलवार त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर लागली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
प्रविण जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना आरोपी अनिकेतने त्यांच्यावर दगडफेक केली. त्याचवेळी आरोपींच्या गाडीत बसलेल्या चालकाने भरधाव वेगात गाडी प्रविण यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रविण यांनी बाजूला उडी मारल्याने ते गाडीखाली येण्यापासून थोडक्यात वाचले.
यवत पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक मेतलवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
