Mumbai news : ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा ४ ऑक्टोबरला; मंगळवारी शिवतीर्थावर पत्रकार परिषद
Mumbai news : मुंबई : देशभरात एसआयआरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
1 મિનિટ વાંચન

Mumbai news : मुंबई : देशभरात एसआयआरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून टीका होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातही या मुद्द्यावरून हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.
या संयुक्त मोर्चाची घोषणा झाल्यानंतर आता त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी ठाकरे बंधूंकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या या मोर्चाला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा सहभाग राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता दिसून आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावर एकवाक्यता आहे का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे बंधूंकडून या मोर्चाचे नियोजन सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, यासाठी तयारी केली जात आहे. मुंबईतील या शक्तिप्रदर्शनाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत मोर्चाची दिशा, नियोजन आणि सहभागी होणाऱ्या पक्षांबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मंगळवारी नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
