Raj Thackeray : "संध्याकाळी या, कसं कंपल्सरी करतात ते बघतो!"; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक, साई डोंगरावर प्रत्यक्ष पाहणी
•टॉरेंट पॉवरच्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर कडाडून टीका; स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा शब्द देत आज सायंकाळी जाहीर सभेचा इशारा
1 મિનિટ વાંચન

•टॉरेंट पॉवरच्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर कडाडून टीका; स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा शब्द देत आज सायंकाळी जाहीर सभेचा इशारा
कर्जत :- कर्जत-भीमाशंकर परिसरातील साई डोंगरावर प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट मैदानात उतरले आहेत. स्थानिकांनी मुंबईत भेटून कैफियत मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी प्रत्यक्ष कर्जत येथील साई डोंगरावर जात तोडण्यात आलेल्या झाडांची आणि परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिकांच्या व्यथा ऐकून घेत त्यांनी प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, "संध्याकाळी सभेला या, हा प्रकल्प कसा कंपल्सरी होतो ते मी बघतो," अशा शब्दांत सरकारला थेट आव्हान दिले आहे.
13 हजार कोटींच्या प्रकल्पावरून सह्याद्रीच्या रांगा धोक्यात
गुजरातच्या टॉरेंट पॉवर कंपनीच्या माध्यमातून सुमारे 13 हजार 500 कोटी रुपये खर्च करून 3 हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी शेकडो जुनी झाडे तोडली जात असल्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आदिवासींचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप लाचलचला आहे.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
स्थानिकांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आज सायंकाळी एका जाहीर सभेचे आयोजन केले असून, या प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमकपणे लढा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका बाजूला सत्ताधाऱ्यांकडून प्रकल्पाचे समर्थन केले जात असताना, राज ठाकरेंच्या या थेट हस्तक्षेपामुळे कर्जत-भीमाशंकरचा हा वाद आता राज्यभरात चांगलाच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
