Pune News : पाण्याची नासाडी केल्यास १० हजारांचा दंड
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून पाणीटंचाईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या गैरवापराविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News : दोनदा नियम मोडल्यास दंड; तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून पाणीटंचाईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या गैरवापराविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन धुणे, जलतरण तलाव भरणे, खासगी उद्यानांना पाणी देणे तसेच बांधकाम आणि रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरल्यास संबंधितांवर १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी या उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केला असून, पाणीपुरवठा विभागासह क्षेत्रीय कार्यालये, उद्यान विभाग, बांधकाम विकास, भवन रचना आणि पथ विभागावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे..https://maharashtramirror.com/ Pune News
वाहन धुण्याच्या केंद्रांवर निर्बंध
पाणीकपातीच्या काळात शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहन धुण्याची केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करून केंद्र सुरू असल्याचे आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. मात्र, स्वतःच्या बोअरवेल किंवा विहिरीतील पाणी वापरणाऱ्या वाहन धुण्याच्या केंद्रांना रविवार, मंगळवार आणि गुरुवार या तीन दिवशी सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक आणि खासगी जलतरण तलाव भरण्यासाठी तसेच खासगी उद्यानांना पाणी देण्यासाठी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी
शहरातील इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची कामे आणि रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. या कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी किंवा बोअरवेल आणि विहिरीतील पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यासह संबंधित काम बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
अनधिकृत नळजोडणीवरही कारवाई
महापालिकेची अनधिकृत नळजोडणी आढळल्यास ती तातडीने बंद करून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुन्हा अनधिकृत जोडणी घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास एक हजार रुपये, तर टँकरमधून पाण्याची गळती होत असल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे.
सोसायट्यांनाही सूचना
गृहनिर्माण सोसायट्यांमधील बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी नोटिसा देण्यात येणार आहेत. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानांसाठी आणि स्वच्छतागृहांतील फ्लशिंगसाठी करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. पाण्याच्या टाक्या भरून वाहू नयेत, यासाठी स्वयंचलित फ्लोट व्हॉल्व्ह बसविण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
नियमांचे दोनदा उल्लंघन करून दंडात्मक कारवाई झाल्यानंतर तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे भिमाले यांनी स्पष्ट केले. प्रत्येक संबंधित विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करून केलेल्या कारवाईचा अहवाल दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाणीपुरवठा विभागाला सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
