Pune News : विद्यापीठातील अनावश्यक बांधकामे थांबवून वसतिगृह व फी सवलतीसाठी निधी वापरा
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाणीटंचाईची गंभीर समस्या लक्षात घेता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News :रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाणीटंचाईची गंभीर समस्या लक्षात घेता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्यापीठ परिसरात सुरू असलेली अनावश्यक व नियमबाह्य बांधकामे त्वरित थांबवून, तो निधी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि रिफॅक्टरीमधील भोजनव्यवस्थेसाठी वापरण्यात यावा, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या (आठवले) वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुरज श्रीराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी दि. २९ विद्यापीठाच्या कुलसचिवांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.https://maharashtramirror.com/ Pune News
प्राधान्यक्रम आणि उपलब्ध निधीच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह
सध्या एका बाजूला विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शैक्षणिक फी, वसतिगृहाचा खर्च आणि भोजनाचा भार सहन करणे कठीण जात आहे. अशा बिकट परिस्थितीत दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनाकडून विविध बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या प्राधान्यक्रमाबाबत आणि उपलब्ध निधीच्या वापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
काय आहेत मागण्या
विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या बांधकामांची आवश्यकता, त्यावर होणारा खर्च आणि त्यांना मिळालेल्या शासकीय व प्रशासकीय मंजुरीची सखोल तपासणी करण्यात यावी. शासनाच्या लागू आदेशांचे अथवा नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवण्यात यावीत. अनावश्यक बांधकामांवरील खर्चाचा फेरआढावा घेऊन तो निधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपलब्ध करून देण्याच्या शक्यतेची तात्काळ चाचपणी करावी. आर्थिक अडचणीत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत, फीमाफी किंवा आर्थिक मदत देण्यासाठी योग्य व प्रभावी योजना राबवण्यात यावी.
गरजू विद्यार्थ्यांच्या वसतिगृह फीचा भार कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच विद्यापीठाच्या रिफॅक्टरीमध्ये परवडणाऱ्या दरात, स्वच्छ व पौष्टिक भोजन उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करावी. सध्या सुरू असलेल्या बांधकामांचा खर्च, मंजुरी, कंत्राटे आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उपलब्ध निधी या सर्व बाबींची माहिती सार्वजनिक करून पारदर्शकता आणावी. अशा मागण्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या (आठवले) वतीने करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास आणि भोजन या अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष न करता उपलब्ध निधीचा न्याय्य व पारदर्शक वापर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. येत्या ४८ तासांत या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व अनावश्यक बांधकामे थांबवण्यात यावीत आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. अन्यथा, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र निदर्शने व आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांनी दिला आहे.
