મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

लोणावळ्यात मुसळधार ; कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

3 મિનિટ વાંચન

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

लोणावळ्यात मुसळधार ; कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी (दि. १) दुपारपासून पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. (Pune Rain update ) सुरुवातीला हलक्या स्वरूपात असलेल्या या पावसाने नंतर चांगलाच जोर पकडला. विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असून, पर्यटननगरी लोणावळ्याला पावसाने झोडपून काढले आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, ७ जुलैपर्यंत शहर आणि परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (pune rain update heavy rain lonavala red alert mumbai kokan)

मावळ, जुन्नर, खेडमध्ये हजेरी; उष्णतेपासून दिलासा

गेल्या दहा दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात पावसाने उघडीप दिली होती. (Pune Rain update ) त्यामुळे वातावरणात पुन्हा कमालीचा उकाडा आणि उष्णता जाणवू लागली होती. मात्र, बुधवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आज, गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मावळ, आंबेगाव या ग्रामीण आणि घाटमाथ्या लगतच्या भागातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

हेही वाचा: Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! जहांगीर चौक ते मंगलदास चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पाऊस; तरीही एकूण पाऊस घटला

लोणावळा आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या २४ तासांत येथे ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी यंदा आत्तापर्यंत अवघा ५८६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तब्बल २०६१ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस नोंदवला गेला होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण पाऊस बराच कमी असल्याने लोणावळावासीय आणि पर्यटकांना अजूनही मोठ्या ‘धो-धो’ पावसाची प्रतीक्षा आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला ‘रेड अलर्ट’
राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने सकाळी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी आधी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता; मात्र पावसाचा वाढता वेग पाहून अवघ्या एका तासानंतर तो अपग्रेड करत ‘रेड अलर्ट’ जारी केला. पुढील काही तासांत या चारही जिल्ह्यांमध्ये प्रतितास १५ मिमीपेक्षा अधिक वेगाने मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Pune News: पदोन्नतीनेच होणार रिक्त पदांची भरती; पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

तळकोकणात मुसळधार

तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळत असून, किनारपट्टीवर ताशी ४० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहत आहेत. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व बंदरांवर ‘३’ नंबरचा धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे.

माडखोल धरण शंभर टक्के भरले

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सावंतवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्प असलेले ‘माडखोल धरण’ १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहे. मालवणमधील मालोंड चाळादेव येथे देवस्थानचे मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने पद्माकर फणसगांवकर या शेतकऱ्याच्या शेतघराचे (मांगराचे) आणि चाळादेव येथील मंडपाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Medha Kulkarni Vat Purnima Controversy: खासदार मेधा कुलकर्णींच्या वटपूजेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले!

राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा अंदाज

ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, नागपूर आणि गोंदिया.
रेड अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी.

हवामान अंदाज

७ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम सरी बरसतील. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा हा जोर कायम राहणार आहे.

શેર કરો