મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Pune Crime :पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

गणेशोत्सवात दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
गणेशोत्सवात दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Pune Crime : उत्तर प्रदेशातील आरोपी अटकेत; २१.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, चेन-मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे उघड

Pune Crime :पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विजयपाल कवर सेन (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तपासातून चेन आणि मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान २५ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास सागर प्रकाश कोनटी हे त्यांचे मित्र विक्रांत शिंदे यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बुधवार चौक परिसरात मिरवणूक पाहत होते. त्या वेळी सहा जणांच्या टोळीने गर्दीचा फायदा घेत त्यांना पकडून मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत लोखंडी कटरच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शामलीतील सहा जणांच्या टोळीचा सहभाग

गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या होत्या. सहपोलीस आयुक्त संजय दराड आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि पोलीस अंमलदार चेतन होळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या गुन्ह्यामागे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले. त्यानंतर विजयपाल कवर सेन याला ताब्यात घेण्यात आले.

उत्तर प्रदेशात जाऊन मुद्देमाल हस्तगत

सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने आपल्या आणखी पाच साथीदारांसह संबंधित गुन्ह्यासह अन्य गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर अनिल सुरवसे यांच्यासह नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल अव्हाड, गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला. आरोपीकडून चोरीचे १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तक्रारदाराचा मोबाईल फोन, एक धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमुळे दाखल गुन्ह्यासह आणखी १२ अशा चेन आणि मंगळसूत्र चोरीच्या एकूण १३ गुन्ह्यांचा उलगडा झाल्याचे फरासखाना पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો