મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’; २५ अवैध शस्त्रे जप्त, २० आरोपींना अटक

Pune Crime : दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत १,४६२ वाहनांची तपासणी; ३५८ हॉटेल-लॉजची झाडाझडती, फरार आणि तडीपार आरोपींवरही कारवाई

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’
२५ अवैध शस्त्रे जप्त, २० आरोपींना अटक

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी २७ ते २८ नोव्हेंबरदरम्यान विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. परिमंडळ १ ते ७ आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी केलेल्या या मोहिमेत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात २३ गुन्हे दाखल करून १६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान शहरात ६५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले, तर संवेदनशील आणि गर्दीच्या ७९ ठिकाणी पायी गस्त घालण्यात आली. विविध नाकाबंदीच्या ठिकाणी १ हजार ४६२ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये ७९ कारवाया करण्यात आल्या. याशिवाय शहरातील ३५८ हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखान्यांची तपासणी करण्यात आली. महत्त्वाच्या व संवेदनशील अशा १७२ ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करत पोलिसांनी कारागृहातून सुटलेल्या ६६० आरोपींची तपासणी केली. खुनाच्या गुन्ह्यांतील १८३, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील ३१७ आणि मोक्का गुन्ह्यांतील २१३ आरोपींची पडताळणी करण्यात आली. आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) मधील १२९ आणि कलम ४(२५) मधील ३१२ आरोपींची तपासणी करण्यात आली. एनडीपीएस गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींपैकी ७० जण मिळून आले.

पोक्सो गुन्ह्यांतील १०६ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४३ जण मिळून आले. जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतील १०६ आरोपींची तपासणी केली असता ४४ जण मिळून आले. या मोहिमेत विविध गुन्ह्यांतील पाहिजे असलेले दोन आरोपी आणि मोक्का गुन्ह्यातील एका पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली. तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आठ जणांनाही अटक करण्यात आली. तसेच अजामीनपात्र वॉरंटपैकी चार वॉरंट बजावण्यात आले.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करून १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ शस्त्रे जप्त केली आहेत. शस्त्रविक्री करणाऱ्या २२ आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करण्यात आली. दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये सहा कारवाया करण्यात आल्या. अवैध धंद्यावर छापा टाकून एका आरोपीला अटक करण्यात आली.

याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये आठ, कलम १२२ अन्वये एक, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सहा आणि इतर २८ कारवाया करण्यात आल्या. पुणे शहर पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्षाशी ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper