Pune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय
Pune Airport News : प्रवासी चढवणे-उतारण्याच्या मार्गिकांसाठी १५ मिनिटांची वेळमर्यादा; नियम मोडणाऱ्या वाहनांना ५०० रुपये दंड होणार
4 મિનિટ વાંચન

Pune Airport News : पुणे: वाहतुकीची अधिक सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे आणि प्रवाशांची सोय वाढवणे, या उद्देशाने पुणे विमानतळावर प्रवासी चढवणे आणि उतरवण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गिकांचा वापर करणाऱ्या वाहनांसाठी जास्तीत जास्त १५ मिनिटांची वेळमर्यादा लागू करण्यात येत आहे. यामध्ये प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी ५ मिनिटांचा थांबा समाविष्ट आहे. पुणे विमानतळावरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, शहराच्या बाजूच्या उपलब्ध रस्ते पायाभूत सुविधांचा कार्यक्षम वापर अधिक महत्त्वाचा झाला आहे. अनेक वाहने आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ प्रवासी चढवणे-उतारण्याच्या मार्गिकांमध्ये थांबत असल्याचे, तसेच काही वाहने दीर्घकाळ वाट पाहत किंवा पार्क करून ठेवली जात असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारांमुळे टाळता येण्याजोगी वाहतूक कोंडी होते, इतर वाहनांच्या सुरळीत हालचालींना अडथळा निर्माण होतो आणि काही वेळा वाहनचालक व वाहतूक व्यवस्थापनासाठी तैनात कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद होतात.
या समस्येवर उपाय म्हणून आणि वाहतुकीत अधिक शिस्त राखण्यासाठी गठित समितीने या मार्गिकांचा वापर करणाऱ्या वाहनांसाठी जास्तीत जास्त १५ मिनिटांचा कालावधी मंजूर केला आहे. या निर्धारित कालावधीत प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी ५ मिनिटांचा थांबा समाविष्ट आहे. निर्धारित वेळमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना लागू असलेल्या विमानतळ विनियम, २००३ मधील तरतुदींनुसार ₹५०० दंड आकारला जाईल. या वेळमर्यादेवर विमानतळावर बसवलेल्या स्वयंचलित वाहन क्रमांक-पट्टिका ओळख प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाईल. प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर बसवलेले कॅमेरे वाहन नोंदणीची माहिती आणि छायाचित्रे नोंदवतील. त्याद्वारे प्रणाली प्रत्येक वाहनाने निश्चित केलेल्या प्रवासी चढवणे-उतारण्याच्या मार्गिकांमध्ये घालवलेला एकूण वेळ आपोआप मोजू शकेल.
परवानगीपेक्षा जास्त वेळ थांबलेली वाहने या प्रणालीद्वारे ओळखली जातील आणि त्यांच्याकडून निर्धारित दंड वसूल केला जाईल. दंड डिजिटल पेमेंट सुविधांद्वारे, शक्यतो फास्टटॅग किंवा क्यू आर कोड-आधारित पेमेंट पद्धतीने, भरता येईल. निर्गमन द्वाराजवळ अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून पेमेंट वसुलीची व्यवस्था प्रवासी चढवणे-उतारण्याच्या क्षेत्रातील एका निश्चित ठिकाणी केली जाईल. आगमन करणाऱ्या प्रवाशांची वाट पाहण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्यास किंवा प्रवाशांसोबत टर्मिनलच्या आत जाण्याचा विचार असल्यास, प्रवासी, भेट देणारे आणि वाहनचालक यांनी बहुस्तरीय वाहनतळ /एरो मॉलच्या पार्किंग सुविधांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी विनामूल्य शटल बस सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवासी आणि त्यांच्यासोबत आलेल्या भेट देणाऱ्यांना ये-जा करणे सुलभ होते.
वाहनचालकांना नव्या व्यवस्थेची माहिती व्हावी यासाठी तंत्रज्ञानाधारित वेळ-निरीक्षण प्रणालीची चाचणी तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. या चाचणी कालावधीत प्रवासी आणि वाहनचालकांना ५ मिनिटांच्या थांब्यासह १५ मिनिटांच्या वेळमर्यादेविषयी योग्य माहिती देऊन जागरूक केले जात आहे, जेणेकरून त्यांना नियमांची जाणीव होईल आणि नव्या व्यवस्थेकडे सुरळीतपणे वळता येईल.
३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या चाचणी कालावधीत कोणताही दंड आकारला जाणार नाही.
वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि निर्धारित वेळमर्यादेचे स्वेच्छेने पालन करण्यास प्रोत्साहन देणे, हा चाचणी टप्प्याचा उद्देश आहे.१ डिसेंबर २०२६ पासून ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईल. त्यानंतर १५ मिनिटांची परवानगीयोग्य वेळमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना लागू असलेल्या विमानतळ विनियम, २००३ मधील तरतुदींनुसार ₹५०० दंड आकारला जाईल.
वेळेच्या बंधनावर आधारित या व्यवस्थेमुळे वाहनचालकांमध्ये अधिक शिस्त निर्माण होईल, वाहनांची ये-जा वेगाने होईल आणि उपलब्ध कर्बसाइड जागेचा अधिक कार्यक्षम वापर सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा आहे. गर्दीच्या वेळेत वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते. अशा वेळी हा उपक्रम विशेषतः फायदेशीर ठरेल.
वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहनांची अनावश्यक प्रतीक्षा कमी करणे आणि विमानतळापर्यंत पोहोचण्याचा एकूण अनुभव सुधारणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला उपक्रम असून, दंडातून महसूल मिळवण्याऐवजी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यावर त्याचा भर आहे.
पुणे विमानतळाने सर्व प्रवासी, भेट देणारे आणि वाहनचालकांना निर्धारित वेळमर्यादेचे पालन करण्याचे, आवश्यकतेनुसार निश्चित पार्किंग सुविधांचा वापर करण्याचे आणि विमानतळाच्या वाहतूक व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्व संबंधितांच्या सक्रिय सहकार्याने प्रत्येक प्रवाशासाठी विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोयीचा करण्याचे पुणे विमानतळाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “प्रवाशांची सोय आणि विमानतळापर्यंतचा विनाअडथळा प्रवेश हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे. पुणे विमानतळावर तंत्रज्ञानाधारित १५ मिनिटांची वेळमर्यादा लागू केल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास, वाहतूक अधिक सुरळीत होण्यास आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होईल. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या उपक्रमामुळे वाहतुकीत शिस्त येईल आणि विमानतळाचा अनुभव अधिक सुरक्षित, सुरळीत व त्रासमुक्त बनेल. सर्व प्रवासी आणि वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे मी आवाहन करतो.”
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper

