મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

वाकड, शिरगाव आणि दक्षिण म्हाळुंगे परिसरातील अवैध हातभट्टी दारू अड्डे केले पोलिसांनी उध्वस्त

शिरगाव आणि दक्षिण म्हाळुंगेत ९ लाख १५ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू आणि कच्चे रसायन जप्त; ५ जणांवर गुन्हे

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

वाकड, शिरगाव आणि दक्षिण म्हाळुंगे परिसरातील अवैध हातभट्टी दारू अड्डे केले पोलिसांनी उध्वस्त

शिरगाव आणि दक्षिण म्हाळुंगेत ९ लाख १५ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू आणि कच्चे रसायन जप्त; ५ जणांवर गुन्हे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारूने अनेकांचे बळी घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात पोलिसांनी धाड टाकून एक अवैध हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला. या ठिकाणी प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये अवैध हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी आता हा अवैध दारू धंदा धाड टाकून उध्वस्त केला आहे.

शिरगाव आणि दक्षिण म्हाळुंगे (चाकण) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी तब्बल ९ लाख १५ हजार रुपयांची बेकायदेशीर हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त केले आहे. या कारवाईत ४ महिला आरोपींसह एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरगाव-परंदवडी हद्दीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे
शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पहिल्या कारवाईत शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला एका महिला आरोपीने जमिनीतील खड्ड्यात ताडपत्री टाकून दारू तयार करण्याचे गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी या ठिकाणाहून ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० हजार लिटर कच्चे रसायन शोधून काढले. पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी तिथून पळून गेली.

पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

दुसरी कारवाई ओझर्डे गावाच्या हद्दीत पवना नदीकाठी केली. महिला आरोपीने ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ११ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातले होते. ही महिला आरोपी देखील पोलिसांना पाहताच फरार झाली. तिसऱ्या कारवाईत शिरगाव गावच्या हद्दीत एका खडड्याच्या जवळ राधिका कुमार नानावत या महिला आरोपीने १ लाख ४० हजार रुपयांचे दारूचे कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलीस आल्याचे समजताच ती देखील पळून जाण्यात यशस्वी ठरली. पोलीस कॉन्स्टेबल सागर कोळी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चाकण आणि निघोजे परिसरातही पोलिसांनी छापेमारी
तर चाकण आणि निघोजे परिसरातही पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावातील पठारे वस्ती येथे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने छापा टाकला. तेथे एका महिला आरोपीने ३ प्लास्टिकच्या ड्रममध्ये ४० हजार रुपये किमतीचे ८०० लिटर उग्र वासाचे गावठी दारूचे रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी पंचांसमक्ष हे रसायन जागीच नष्ट केले असून महिलेवर गुन्हा दाखल केला.

दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी निघोजे मौजे येथील डोंगरवस्ती भागात पिनेकल डायीज कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडजवळ कारवाई केली. तेथे नितीन धोंडीबा गायकवाड (वय ५३, रा. जयभिम वस्ती, निघोजे) हा १० हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी जवळ बाळगून असताना रंगेहात मिळाला. पोलीस शिपाई प्रशांत कसबे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. दापोडी विषारी दारू दुर्घटना प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सक्त कारवाईचे आदेश दिले तसेच दापोडी पोलिस स्टेशन आणि घटना स्थळाला त्यांनी दिली भेट दिली.

શેર કરો