PMC News : पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या पद्धतीची चौकशी करा
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पुणे महापालिकेमध्ये नेमलेल्या सुरक्षारक्षकांवरून महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
1 મિનિટ વાંચન

भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांची मागणी
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पुणे महापालिकेमध्ये नेमलेल्या सुरक्षारक्षकांवरून महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. याबाबत सुरक्षारक्षकांची नेमणूक व त्यांच्या कामाच्या पद्धतीची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.PMC News
निवेदनात म्हटले आहे, सुरक्षा पुरविणाऱ्या एजन्सींच्या नोंदी, प्रत्यक्ष कार्यरत सुरक्षा रक्षकांची संख्या आणि महापालिकेकडे असलेल्या नोंदी यांची पडताळणी करावी. सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर दिले जाते का, एजन्सीकडून पूर्ण वेतन मिळते का, याची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. महापालिकेत सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकाने कामात कसूर केल्यास त्याला संबंधित ठेकेदाराकडे पाठवले जाते किंवा त्याचे काम थांबवले जाते. संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करताना कोणतीही अंतर्गत चौकशी केली जात नाही. त्या सुरक्षा रक्षकांचे म्हणणेही ऐकून घेतले जात नाही. एकतर्फी पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जाते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्या जागेवर नवीन सुरक्षा रक्षक नेमले जातात. अधिकाऱ्यांची ही कार्यपद्धती संशयास्पद आहे. काही सुरक्षा रक्षकांना कमी करून तिथे नवीन सुरक्षा रक्षक नेमताना अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार होतात, अशाही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात यावी आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गंभीर कारवाई करण्यात यावी.PMC News :

महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीसंदर्भात लोकप्रतिनिधींकडून शिफारस करण्यात येते. हे खरे असले तरी लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागातील एखाद्या व्यक्तीची शिफारस करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला आधार मिळतो. याकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते, अशा तक्रारी आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन नेमणूक केल्यामुळे अनेक बेरोजगार पात्र उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक मिळत नाही. तसेच काही सुरक्षा रक्षकांना चुकीच्या कारणावरून नोकरीवरून कमी केले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
