PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द; 12 डिसेंबर रोजी शरद पवार करणार ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन
• PM Narendra Modi Baramati Visit Postpone आधी 3 नोव्हेंबर व नंतर 16 नोव्हेंबरची तारीख होती चर्चेत; वाढदिवशीच पवारांच्या हस्ते अनावरणाचा निर्णय
2 મિનિટ વાંચન

बारामती / पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असून, बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन आता स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. शरद पवार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
दौऱ्याची पार्श्वभूमी आणि 12 डिसेंबरचा मुहूर्त
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संकुलातील नव्या ‘प्रेरणास्थळ’ वास्तूच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी खुद्द शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. या दौऱ्यासाठी सुरुवातीला 3 नोव्हेंबर आणि त्यानंतर 16 नोव्हेंबर या तारखा चर्चेत होत्या. मात्र, शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने आणि प्रशासकीय कारणांमुळे हा दौरा लांबणीवर पडला होता.
आज दौऱ्याची नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, पंतप्रधानांचा दौरा तूर्तास रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आपल्या वाढदिवसालाच म्हणजेच 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पार पडणार आहे.
दौऱ्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार गोविंदबागकडे रवाना; सुप्रिया सुळे, युगेंद्र व जय पवार यांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार पुन्हा आपल्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी रवाना झाले. तत्पूर्वी, खासदार शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात आले होते. शरद पवार गेल्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार यांची बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

