सायबर चोरट्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका
अमेरिकेतील बँकेत गेलेले ५६ लाख परत; भोसरीतील उद्योजकाला मोठा दिलासा
1 મિનિટ વાંચન

अमेरिकेतील बँकेत गेलेले ५६ लाख परत; भोसरीतील उद्योजकाला मोठा दिलासा
पिंपरी: भोसरीतील एका उद्योजकाची बनावट ईमेलच्या माध्यमातून तब्बल ५६ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अमेरिकेतील बँकेशी थेट संपर्क साधला आणि अवघ्या काही दिवसांत संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली. या कारवाईमुळे सायबर चोरट्यांना मोठा दणका बसला आहे.

भोसरी येथील ‘पीएचबीबी वाल्व्हज प्रा. ली.’ कंपनीचे संचालक संजय जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांचा चीनमधील ‘वेनझाऊ आर्टेक मशिनरी टेक्नॉलॉजी’ या कंपनीसोबत व्यावसायिक व्यवहार सुरू होता. याच व्यवहाराची माहिती मिळवत अज्ञात सायबर चोरट्याने संबंधित कंपनीच्या ईमेलशी साधर्म्य असलेला बनावट ईमेल आयडी तयार केला.
ईमेलवर विश्वास ठेवला
त्या ईमेलवरून कंपनीचे बँक खाते बदलल्याचे सांगण्यात आले. नवीन खात्यावर तातडीने पैसे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ईमेलवर विश्वास ठेवल्याने जाधव यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकेतील सिटीझन बँकेच्या खात्यावर ५६ लाख रुपये पाठवले.
दरम्यान, संबंधित चिनी कंपनीशी संपर्क साधल्यानंतर खाते बदलले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तातडीने ऑनलाइन तक्रार दाखल केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमेरिकेतील बँकेशी संपर्क
सायबर पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने अमेरिकेतील बँक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने ईमेलद्वारे संपर्क ठेवला. पोलिसांनी व्यवहारासंदर्भातील तांत्रिक पुरावे सादर केले. हा व्यवहार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर बँकेने संबंधित रक्कम फ्रिज केली. त्यानंतर संपूर्ण ५६ लाख रुपये तक्रारदाराच्या खात्यात परत जमा करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने केली. सायबर पोलिसांनी नागरिकांना परदेशी व्यवहार करताना खात्याची माहिती अधिकृत माध्यमातून पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे.
