दारू पिण्याच्या वादातून एकाची दगड घालून हत्या
कोंढवा बुद्रुक येथील आर.के.
1 મિનિટ વાંચન

कोंढवा बुद्रुक येथील आर.के. कॉलनी परिसरातील घटना
पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, कोंढवा परिसरात दारू पिण्याच्या कारणावरून एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

पुणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते रात्री ११:३० च्या दरम्यान कोंढवा बुद्रुक येथील आर.के. कॉलनी परिसरातील एका टेकडीच्या कडेला घडली. मनिषकुमार महादेव पासवान (वय २२ वर्ष, रा. कोंढवा बु.) असे मृत तरुणाचे नाव आहे.
वादाचे रूपांतर हत्येत
आरोपी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५ वर्ष, रा. कात्रज-कोंढवा रोड) आणि मयत मनिषकुमार यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने रागाच्या भरात मनिषकुमारच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात मनिषकुमारचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कारवाई
याप्रकरणी कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) (खून) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महादेव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे करत आहेत.
