Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबईत देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी तरुणीची वेश्या व्यवसायातून सुटका, बनावट आधारकार्ड पाहून पोलीसही चक्रावले!
Navi Mumbai Latest Sex Racket : अहमदाबाद ते तळोजा पसरलेले आंतरराज्य जाळे उघड; 'त्या' एका मोबाईलमधील चॅटिंगने आरोपीचे बिंग फोडले
2 મિનિટ વાંચન

Navi Mumbai Latest Sex Racket : अहमदाबाद ते तळोजा पसरलेले आंतरराज्य जाळे उघड; 'त्या' एका मोबाईलमधील चॅटिंगने आरोपीचे बिंग फोडले
नवी मुंबई :- नवी मुंबई गुन्हे शाखेच्या Navi Mumbai Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तळोजा परिसरात एक धाडसी कारवाई करत आंतरराज्य देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका बांगलादेशी तरुणीची नरकातून सुटका करण्यात आली असून, तिला वेश्या व्यवसायासाठी राबवून घेणाऱ्या नोयोन टोकिबोर शेख उर्फ आर्यन या बांगलादेशी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Navi Mumbai Latest News
तपासणीत धक्कादायक खुलासे
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तळोजा येथील घोट गावातील 'कृष्णकुंज' इमारतीमध्ये ही धाड टाकली. सुरुवातीला काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांनी सदनिकेची झडती घेतली असता तिथे नोयोन शेख याच्यासोबत दोन तरुणी आढळल्या. त्यापैकी एका तरुणीकडे चक्क भारतीय आधारकार्ड आणि ओळखपत्रे सापडली. ही कागदपत्रे बनावट असल्याचे आणि ती तरुणी मूळची बांगलादेशी असल्याचे समोर आल्यावर पोलीसही अवाक झाले.
जिल्ह्या-जिल्ह्यांत पाठवून वसुली
अटक करण्यात आलेल्या नोयोन याच्या मोबाईलची कसून तपासणी केली असता, या रॅकेटची भीषणता उघड झाली. त्याने या पीडित तरुणीला अहमदाबाद येथून आणले होते. केवळ तळोजाच नव्हे, तर सातारा, नाशिक, जालना, रायगड आणि लोणावळा यांसारख्या विविध पर्यटन स्थळांवर आणि जिल्ह्यांत तिला ग्राहकांकडे पाठवले जात होते. धक्कादायक म्हणजे, या व्यवसायातून मिळणारा सर्व पैसा आरोपी स्वतःच्या खात्यात जमा करून घेत होता. अहमदाबादमधील एका महिलेने आणि तिच्या पतीनेही या तरुणीला जबरदस्तीने या दलदलीत ढकलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ग्राहकांची चौकशी सुरू; अनेकांचे धाबे दणाणले
या कारवाईनंतर आता नवी मुंबई पोलिसांनी आपला तपासाचा फास अधिक आवळला आहे. पीडितेला ज्या ज्या ठिकाणी ग्राहकांकडे पाठवण्यात आले होते, त्या सर्व ग्राहकांची आणि मध्यस्थांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. यामुळे या अवैध कृत्यात सहभागी असणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नोयोनच्या मोबाईलमध्ये अनेक संशयित नंबर आणि चॅटिंग सापडले असून, त्या आधारे पोलीस आता पुढील आरोपींच्या शोधात आहेत.
कडक कायदेशीर कारवाई
या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या (PITA) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किशोर खडके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
