Navi Mumbai Crime News : रबाळे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धेची चैन खेचणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
•रॉयल एनफिल्ड बुलेट आणि सोन्याची चैन असा 4.41 लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपींवर खून, बलात्कार आणि पॉक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल
2 મિનિટ વાંચન

•रॉयल एनफिल्ड बुलेट आणि सोन्याची चैन असा 4.41 लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपींवर खून, बलात्कार आणि पॉक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल
नवी मुंबई :- घणसोली परिसरात मॉर्निंग वॉक आटोपून घरी परतणाऱ्या एका 54 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन भररस्त्यात खेचून पळणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या रबाळे पोलिसांनी आवळल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा थरारक मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
તસવીરો · 1/2
Arrow Keys ⟵ ⟶

भरसकाळी घडला होता थरार
14 मार्च 2026 रोजी सकाळीच्या सुमारास फिर्यादी अनिता राजकुमार गुप्ता या आपल्या सोसायटीमध्ये स्कुटी पार्क करत होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 25 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरीने खेचली आणि दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाचे चक्र फिरले अन् आरोपी जाळ्यात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अजिंक्य अनंत शिंदे (वय 36, रा. कामोठे) आणि रिजवान उर्फ बाबू रफिक खान (रा. अलिबाग) या दोघांना बेड्या ठोकल्या. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या अजिंक्य शिंदे आणि रिजवान खान या दोघांवर यापूर्वी खून, जबरी चोरी, बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 1 लाख 50 हजार रुपयांची रॉयल एनफिल्ड बुलेट आणि चोरीला गेलेली अंदाजे 2.91 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, असा एकूण 4 लाख 41 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ज्वेलर्सनाही पोलिसांचा दणका
चोरीचे सोने विकत घेण्याच्या संशयावरून अलिबाग येथील सत्यवान सुबराव तमखडे आणि रूपेश भरत पाटील या दोन ज्वेलर्सना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात चोरीचे सोने घेणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, दर्शन कटके, मयूर सोनवणे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत अल्पवधीत या गुन्ह्याचा उलगडा करून रबाळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.
