મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Crime News : कर्जतच्या फार्म हाऊसमधील 'हाय-प्रोफाईल' ड्रग्ज फॅक्ट्रीचा मास्टरमाइंड अटकेत

•600 कोटींच्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश,फार्महाऊस बकरी पालनाच्या नावाखाली घेतलं आणि केली ड्रग्ज निर्मिती; गंध लपवण्यासाठी केमिकलचा शिताफीने वापर

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Mumbai Crime News : कर्जतच्या फार्म हाऊसमधील 'हाय-प्रोफाईल' ड्रग्ज फॅक्ट्रीचा मास्टरमाइंड अटकेत

•600 कोटींच्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश,फार्महाऊस बकरी पालनाच्या नावाखाली घेतलं आणि केली ड्रग्ज निर्मिती; गंध लपवण्यासाठी केमिकलचा शिताफीने वापर

मुंबई | मुंबई पोलिसांना रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे असलेल्या सावली फार्महाऊसमधून चालवण्यात येणाऱ्या हाय-प्रोफाईल एमडी ड्रग्ज फॅक्ट्री प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शकील मेमन उर्फ शकील चिकना याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून, तो मागील महिन्यापासून फरार होता. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्यास 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शकील चिकना हा या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड होता. त्याने कर्जतच्या आडवळणाच्या भागात बंगले भाड्याने घेऊन तिथे एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू केली होती. प्रत्येक तीन महिन्यांनी ठिकाण बदलून पोलिसांच्या नजरेतून सुटका केली जात होती. दरमहा जवळपास 100 किलो ड्रग्ज तयार करून मुंबई व इतर शहरांमध्ये पुरवठा केला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने फार्महाऊस मालकास बकरी पालन करण्याच्या बहाण्याने दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. 50 हजार प्रती खोली दरमहा भाडे दिलं जात होतं. ड्रग्ज फॅक्ट्रीतून येणाऱ्या रासायनिक वासावर झाकण्यासाठी बकरींच्या विष्ठेचा वास मुद्दाम वापरला जात होता, त्यामुळे स्थानिकांना संशय येत नव्हता.

मार्च महिन्यात आरसीएफ पोलिसांनी 45 ग्रॅम एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर तपासाचा फास आवळत गेल्यानंतर 6.69 किलो एमडीसह आणखी चार ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली. यांची आंतरराष्ट्रीय किंमत 13.37 कोटी रुपये इतकी आहे.

शकील चिकनाने आपल्या मुलासोबत मिळून तीन महिन्यांपासून सावली फार्महाऊसमध्ये हे रॅकेट चालवलं होतं. दर आठवड्याला 25 किलो प्रमाणे ड्रग्ज तयार होत असल्याची त्याने कबुली दिली आहे. म्हणजेच, तीन महिन्यांत जवळपास 300 किलो ड्रग्ज तयार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं असून, याची किंमत जवळपास 600 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

पोलिस आता या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेत असून, या टोळीने मिळवलेल्या पैशाचा मनी ट्रेल शोधण्यावरही भर देण्यात येत आहे. यामधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Air India Plane Crash : पाच मिनिटांत काळाने गाठले! एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा थरारक अपघात

શેર કરો