जनगणना कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने बैठक
१,६०० नियुक्त पर्यवेक्षकांच्या कामाचा आढावा
1 મિનિટ વાંચન

१,६०० नियुक्त पर्यवेक्षकांच्या कामाचा आढावा
निलेश राऊत
पुणे: जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याचे घरयादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्ष प्रगणकांद्वारे घरभेटी देऊन घरयादीची माहिती संकलित करण्याच्या कामाचा सुरुवात झाली आहे. परंतु या कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने नुकतीच याकामी नियुक्त १६०० पर्यवेक्षक यांची आढावा बैठक श्री गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर आढावा बैठकी मध्ये सुमारे ११००० प्रगणकांद्वारे शहरामध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा आढावा पर्यवेक्षकांच्या मार्फत घेण्यात आला. प्रत्यक्ष प्रगणकांकडून घरभेटी व घरयादी माहिती संकलनाच्या कामाची प्रगती अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यामध्ये येत असलेल्या अडचणींवर चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या, शंकांचे निरसन करण्यात आले.
पुन्हा एकदा उजळणी
तांत्रिक बाबी, ऍपची माहिती याबाबतची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली. सदर बैठकीत सर्व चार्ज ऑफिसर्सना आणि पर्यवेक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगणकांच्या कामावर अधिक प्रभावी देखरेख ठेवून दररोजच्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या तसेच घरभेटींचे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णत्वास नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, जनगणनेचे काम विहित कालमर्यादेत व अचूकतेने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गाला माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे आणि राजेश भोसले सहसंचालक , जनगणना संचलनालय प्रामुख्याने उपस्थित होते.
कामात कसूर करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई:
या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या प्रगणकांनी आणि पर्यवेक्षकांनी पालिकेकडून 'जनगणना किट' ताब्यात घेतले आहेत, परंतु अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली नाही किंवा जे प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिले आहेत, अशा सर्वांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
अशा कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या कर्तव्यावर हजर होऊन काम सुरू करावे, अन्यथा त्यांच्यावर 'जनगणना कायदा १९४८' मधील तरतुदींनुसार कडक शिस्तभंगविषयक आणि कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. सदर जणगणनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचना प्रगणक व पर्यवेक्षक यांस दिल्या.
पुणे न्युज
