Rupali Thombare : "रुपाली चाकणकरांना सह-आरोपी करा!"; रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप, भोंदू खरातला 'बायका पुरवल्याचा' दावा
Rupali Thombare On Rupali Chakankar : महिला आयोगाच्या लेटरहेडचा गैरवापर आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप; अजित पवारांकडे हकालपट्टीची मागणी
2 મિનિટ વાંચન

Rupali Thombare On Rupali Chakankar : महिला आयोगाच्या लेटरहेडचा गैरवापर आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप; अजित पवारांकडे हकालपट्टीची मागणी
पुणे :- नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या सेक्स स्कँडल प्रकरणाने आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उभी फूट पाडली आहे. पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि शॉक देणारे आरोप केले आहेत. "चाकणकर यांनी केवळ भोंदू बाबाला साथ दिली नाही, तर महिलांचे शोषण आणि बलात्कार घडवून आणण्यातही त्यांचा सहभाग आहे," असा खळबळजनक दावा ठोंबरे यांनी केला आहे.
"चाकणकर फरार, त्यांना सह-आरोपी करा"
रुपाली ठोंबरे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चाकणकरांवर हल्लाबोल केला. खरातच्या अटकेनंतर चाकणकर समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाहीत? असा सवाल करत त्यांनी चाकणकर 'फरार' असल्याचा पुनरुच्चार केला.
"भोंदू बाबाला पाणी पुरवण्यापासून तर महिला पुरवण्यापर्यंतची सर्व कामे चाकणकरांनी केली आहेत. संविधानात्मक पदावर बसून महिलांवर अत्याचार करण्यासाठी मदत करणाऱ्या चाकणकरांना या गुन्ह्यात 'सह-आरोपी' करावे," अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.
पत्रकाराला धमकी आणि लेटरहेडचा गैरवापर
ठोंबरे यांनी एक जुना संदर्भ देत खळबळजनक पुरावा सादर केला. एका वर्षापूर्वी जेव्हा 'खबरदार पुढारी' या स्थानिक वृत्तपत्राने अशोक खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड केला होता, तेव्हा रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अधिकृत लेटरहेडचा वापर करून त्या पत्रकाराला धमकी दिली होती आणि जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला होता, असा दावा ठोंबरे यांनी केला आहे. तसेच खरातच्या संस्थेला पाणी मिळावे म्हणूनही महिला आयोगाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष आणि सरकारची बदनामी
"रुपाली चाकणकर यांच्या अशा कृत्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होत आहे. जर अशा महिला पक्षात असतील, तर इतर महिला कार्यकर्त्यांना काम करताना भीती वाटेल," असे ठोंबरे म्हणाल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आपण चाकणकरांच्या राजीनाम्याची आणि पक्षातून हकालपट्टीची रीतसर मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरेंवर निशाणा आणि 58 व्हिडिओंचा इशारा
संपदा मुंडे प्रकरणात जेव्हा अजित पवारांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा सुनील तटकरे यांनी त्यांची पाठराखण का केली? असा प्रश्न ठोंबरेंनी उपस्थित केला. खरातच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या 58 अश्लील व्हिडिओंमध्ये नेमके कोणकोणते नेते आहेत, हे लवकरच समोर येईल आणि त्या सर्वांना सह-आरोपी व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. खरातचे पुण्यातील धायरी किंवा खडकवासला भागातील कनेक्शन आणि त्याच्या घराचे पुरावे दोन दिवसांत सादर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
