મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Maharashtra Election : महाराष्ट्राचा 'महाकौल'! २९ महापालिकांसाठी ३.५ कोटी मतदार ठरवणार शहरांचे भवितव्य; मुंबईत एका जागेसाठी तर पुण्यात चार मतांचा अधिकार

Maharashtra Election Latest News : मुंबईत 'एक प्रभाग-एक उमेदवार', तर उर्वरित महाराष्ट्रात 'पॅनेल' सिस्टीम

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Maharashtra Election : महाराष्ट्राचा 'महाकौल'! २९ महापालिकांसाठी ३.५ कोटी मतदार ठरवणार शहरांचे भवितव्य; मुंबईत एका जागेसाठी तर पुण्यात चार मतांचा अधिकार

Maharashtra Election Latest News : मुंबईत 'एक प्रभाग-एक उमेदवार', तर उर्वरित महाराष्ट्रात 'पॅनेल' सिस्टीम

मुंबई | राज्यात 'मिनी विधानसभा' मानल्या जाणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण १५,९३१ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मुंबईच्या 'एक सदस्यीय' आणि इतर शहरांच्या 'बहुसदस्यीय' प्रभाग पद्धतीमुळे मतदारांमध्ये यंदा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

मुंबईकरांना एकच मत, तर पुण्यात 'चार' बटनांचा खेळ

यंदाच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदान पद्धतीतील तफावत. मुंबई महापालिकेत पारंपारिक एक सदस्यीय प्रभाग पद्धत कायम असल्याने मुंबईकरांना केवळ एकाच उमेदवाराला मतदान करायचे आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसह इतर २८ शहरांमध्ये 'पॅनेल' (बहुसदस्यीय प्रभाग) पद्धत लागू आहे. यामुळे तिथल्या मतदारांना त्यांच्या प्रभागातील सदस्यांच्या संख्येनुसार ३ ते ४ मते देण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे या ठिकाणची राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

ठाकरे बंधूंचे शक्तीप्रदर्शन आणि ईव्हीएमवरील संशय

मुंबईत तब्बल २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी 'मराठी महापौर' आणि 'अदाणीकरण' या मुद्द्यांवर एकत्र येत महायुतीला तगडे आव्हान दिले आहे. मतदानाला जाण्यापूर्वी ठाकरे कुटुंबाने मुंबादेवीचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले. दरम्यान, राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या 'पाडू' (PADU) या नवीन यंत्रावर संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे.

पुण्यात 'काका-पुतण्या' एकत्र; भाजपसमोर मोठे आव्हान

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये यंदा सर्वात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी पुण्यात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यातच आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे पिंपरी-चिंचवडमधील लढत 'हाय-व्होल्टेज' ठरली आहे.

३,१९६ केंद्रांवर 'खाकी'ची करडी नजर

निवडणूक आयोगाने राज्यातील ३,१९६ मतदान केंद्रे 'संवेदनशील' म्हणून घोषित केली आहेत. पुण्यात सर्वाधिक ९९७ संवेदनशील केंद्रे असल्याने तिथे अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. मुंबईत २५,००० हून अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भरारी पथके आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.

मतदारांची जय्यत तयारी अन् 'दुबार' नावांवर टाच

राज्यात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असून, त्यात १.८१ कोटी पुरुष आणि १.६६ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानात पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने १० लाख ३२ हजार दुबार मतदारांची नावे शोधून त्यांच्यासमोर विशेष खूण केली आहे. मुंबईत ७०० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारल्यामुळे रहिवाशांना घरबसल्या मतदानाची सुविधा मिळाली आहे.

શેર કરો