दुर्गादेवी टेकडीवर बिबट्याची चाहूल; सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात खळबळ
देहूरोड–रावेत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1 મિનિટ વાંચન

देहूरोड–रावेत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या दुर्गादेवी टेकडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

देहूरोड, रावेत आणि दुर्गादेवी टेकडी परिसरात बिबट्या फिरताना दिसला. अम्युनिशन फॅक्टरी आणि म्हस्के वस्ती भागातील कॅमेऱ्यांत हालचाली कैद झाल्या. त्यामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. वनविभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बिबट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ठोस पुरावा नव्हता. आता प्रत्यक्ष फुटेज समोर आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. परिसरात रहिवासी वस्ती असल्याने नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिखलीतील चिंचेचा मळा परिसरातही बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सावधगिरीचा इशारा दिला होता. आता दुर्गादेवी टेकडी परिसरातील घटनेमुळे चिंता वाढली आहे.
यापूर्वीही शहरात दोन वेळाबिबट्या आला होता. वनविभागाने त्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
वनविभागाने नागरिकांना सूचना जारी केल्या आहेत. रात्री एकटे फिरणे टाळावे; घराभोवती प्रकाश ठेवावा; लहान मुलांना एकटे सोडू नये आणि बिबट्या दिसल्यास वनविभाग किंवा पोलिसांना कळवावे.
