મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune article : कृष्णजन्माष्टमी : भक्ती आणि लोकपरंपरेचा उत्सव

(स्मिता कुलकर्णी)

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

5 મિનિટ વાંચન

कृष्णजन्माष्टमी : भक्ती आणि लोकपरंपरेचा उत्सव
कृष्णजन्माष्टमी : भक्ती आणि लोकपरंपरेचा उत्सव

(स्मिता कुलकर्णी)

Pune article : कृष्ण जन्माष्टमी, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा प्रमुख हिंदू सण आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाल्याची धार्मिक मान्यता आहे. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. त्यामुळे वैष्णव संप्रदायात या सणाला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक महत्त्व

धार्मिक कथेनुसार, श्रीकृष्णाचा जन्म मथुरेतील कंसाच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी झाला. त्यावेळी मथुरेत कंसाचा अत्याचार वाढला होता. श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या अंतासाठी झाल्याचे मानले जाते. जन्मानंतर वसुदेवांनी बालकृष्णाला यमुना नदी ओलांडून गोकुळात नेले. तेथे नंद आणि यशोदा यांनी त्यांचे पालनपोषण केले. श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम हे रोहिणी आणि वसुदेव यांचे पुत्र होते.
जन्माष्टमीच्या दिवशी भाविक उपवास करतात. दिवसभर भजन-कीर्तन, कृष्णाच्या जीवनावर आधारित कृष्णलीला आणि रासलीला यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी बाळकृष्णाची मूर्ती पंचामृताने स्नान घालून सजवली जाते आणि पाळण्यात ठेवून पूजा, आरती व भक्तिगीते केली जातात. त्यानंतर भाविक उपवास सोडून प्रसादाचे वाटप करतात.
कृष्णाच्या आगमनाचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये छोट्या पावलांचे ठसे काढण्याची परंपरा आहे. हे पावलांचे ठसे घरात बालकृष्णाचे आगमन झाल्याचे प्रतीक मानले जाते. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करण्याचीही परंपरा आहे. श्रीकृष्णाच्या जन्माच्या आनंदात नंदबाबांनी लोकांना भेटवस्तू वाटल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.

जन्माष्टमीचा उत्सव


मथुरा, वृंदावन, गोकुळ आणि द्वारका येथे जन्माष्टमीचा उत्सव विशेष उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर भारत, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही विविध धार्मिक परंपरांनुसार हा सण साजरा केला जातो. वृंदावनमध्ये रासलीला आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मणिपूरमध्ये भाविक दिवसभर उपवास करून रात्री कृष्णाची पूजा करतात. मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

डिजिटल माध्यमांतूनही सणाचा उत्साह


आजच्या डिजिटल युगात कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. डिजिटल शुभेच्छा, व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट आणि इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून नागरिक सणाचा आनंद आणि उत्साह व्यक्त करतात. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे फोटो, व्हिडीओ तसेच आकर्षक कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली जाते.
मध्यरात्री होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माच्या पूजेचे तसेच मंदिरांमधील विशेष कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेल्या भाविकांनाही घरबसल्या या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेता येतो. डिजिटल माध्यमांमुळे सणाचा उत्साह केवळ परिसरापुरता मर्यादित न राहता तो मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचत आहे.

गोपालकाला


कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवानिमित्त तयार केला जाणारा विशेष प्रसाद म्हणजे गोपालकाला. ‘काला’ म्हणजे विविध पदार्थ एकत्र करून तयार केलेला खाद्यपदार्थ. पोहे, ज्वारीच्या व धानाच्या लाह्या, दही, ताक, भिजवलेली चण्याची डाळ, साखर, लोणचे आणि फळांच्या फोडी यांचा वापर करून गोपालकाला तयार केला जातो.
श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गाई चारताना विविध खाद्यपदार्थ एकत्र करून त्याचा काला तयार करून खात असत, अशी धार्मिक कथा आहे. याच परंपरेतून जन्माष्टमीनंतर गोपालकाला प्रसादाचे सेवन करून उपवास सोडण्याची प्रथा रूढ झाली.
गोव्यात गवळणकाला ही परंपरा पाहायला मिळते. कृष्णाचे सोंग घेऊन कृष्णलीलेची गाणी सादर केली जातात आणि शेवटी दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता केली जाते. अशा प्रकारे गोपालकाला आणि दहीहंडी हे कृष्णभक्तीबरोबरच महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचेही महत्त्वाचे प्रतीक बनले आहेत.

शाळांमध्येही रंगतो जन्माष्टमीचा उत्सव


कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह आता शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बालकृष्णाच्या वेशभूषा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व समजावे, तसेच त्यांच्यामध्ये संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव रुजावी, हा या उपक्रमांचा उद्देश असतो.
जन्माष्टमीनिमित्त अनेक शाळांमध्ये विद्यार्थी बालकृष्ण आणि राधेच्या वेशात सहभागी होतात. त्यामुळे या काळात बाजारपेठेतही बालगोपाळांसाठी आकर्षक आणि डिझायनर ‘कान्हा ड्रेस’चीमोठी मागणी वाढते. मोरपिसांचा मुकुट, बासरी, दागिने आणि पारंपरिक पोशाख अशा विविध साहित्याने सजलेले पोशाख बाजारात उपलब्ध होत असून, बालकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांमुळे जन्माष्टमीचा उत्साह आणखी वाढतो.
महाराष्ट्रात जन्माष्टमीसोबतच दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. गोविंद पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडतात. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि कोकणात, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उंचावर दही-दुधाने भरलेली हंडी बांधली जाते. गोविंदा पथके मानवी मनोरे रचून ही हंडी फोडतात. हंडी फोडणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसे दिली जातात.

कृष्णजन्माष्टमी सार्वजनिक उत्सव


कृष्णजन्माष्टमी या पारंपरिक धार्मिक सणाला आता मोठ्या सार्वजनिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरांमध्ये ठिकठिकाणी भव्य देखावे, आकर्षक सजावट आणि रंगीबेरंगी रोषणाई करण्यात येते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
दहीहंडी उत्सवानेही आता पारंपरिक स्वरूपापलीकडे जात ‘अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट’चे रूप धारण केले आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याची चुरस वाढली असून, लाखो रुपयांची बक्षिसे, मोठ्या कंपन्यांचे प्रायोजक आणि राजकीय नेत्यांचा सहभाग यामुळे या उत्सवाला अधिक भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

गोविंदा पथकांचा वाढता उत्साह; सुरक्षेलाही प्राधान्य


दहीहंडी फोडण्यासाठी शहरांमध्ये विविध गोविंदा पथके सज्ज होत असून, उत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच या पथकांचा सराव सुरू होतो. दहीहंडीची उंची वाढत असल्याने मानवी मनोऱ्याचे थर रचण्याची चुरसही वाढली आहे. उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. या पथकांसाठी खास टी-शर्ट, जर्सी तसेच आवश्यक सुरक्षा साहित्य तयार केले जाते.
मानवी मनोरे रचताना दुखापत होण्याचा धोका लक्षात घेऊन आता गोविंदांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जाते. अपघातांचा धोका लक्षात घेऊन अनेक दहीहंडी आयोजकांकडून गोविंदांचा विमा उतरवला जातो. हेल्मेट, सुरक्षा पट्टे, दोरखंड आणि इतर सुरक्षा साधनांचा वापर केला जातो. तसेच काही ठिकाणी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचाराची सुविधाही सज्ज ठेवली जाते.
दहीहंडीच्या सरावादरम्यानही सुरक्षेची काळजी घेतली जाते. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पथके थर रचण्याचा सराव करतात. विशेषतः सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या ‘गोविंदां’च्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले जाते. पावसामुळे घसरलेली जागा, गर्दी आणि उंची यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो; त्यामुळे आयोजक आणि पथकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जाते.
विशेष म्हणजे, दहीहंडीचा उत्सव आता केवळ पुरुषांपुरता मर्यादित राहिलेला नाही. महिलांची स्वतंत्र दहीहंडी पथकेही मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिला गोविंदा पथकेही विविध थर रचून दहीहंडी फोडण्याचे कौशल्य दाखवत आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला आता अधिक व्यापक आणि समावेशक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या पथकांमधील मुले-मुली दहीहंडीच्या काही आठवडे आधीपासूनच नियमित सराव करतात. शारीरिक तंदुरुस्ती, संतुलन, समन्वय आणि संघभावना यावर विशेष भर दिला जातो. पारंपरिक श्रद्धा, उत्साह, स्पर्धेची चुरस आणि आधुनिक सुरक्षाव्यवस्था यांचा संगम झाल्याने शहरांमधील दहीहंडी उत्सव अधिक भव्य होताना दिसत आहे.
‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला’ अशा गाण्यांवर नाचत उत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशे, गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
अशा प्रकारे, कृष्ण जन्माष्टमी हा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, आनंद, एकता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेला सण म्हणून देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काळाच्या ओघात जन्माष्टमीचे स्वरूप जरी बदलले आणि त्यात आधुनिकता आली, तरीही भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि 'गोविंदा रे गोपाळा'चा उत्साह आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम आहे.

શેર કરો