Pune News : खराडीत आरक्षित जागेवर 'चौथ्यांदा' बेकायदेशीर बांधकाम
Pune News : महत्वाचे मुद्दे *खराडी येथील सर्व्हे क्रमांक ६३ येथील भूखंड विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे *कायदेशीर परवानगी न घेता किंवा बांधकाम आराखडा मंजूर न करून घेता या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले *महापालिकेच्या पथकाने दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा घटनास्थळी जाऊन अनधिकृत
3 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे पालिकेचे बुलडोझर पुन्हा फिरले; वारंवार नोटिसा आणि कारवाईनंतरही बांधकाम सुरूच; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची जोरदार मागणी
Pune News : महत्वाचे मुद्दे
*खराडी येथील सर्व्हे क्रमांक ६३ येथील भूखंड विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे
*कायदेशीर परवानगी न घेता किंवा बांधकाम आराखडा मंजूर न करून घेता या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले
*महापालिकेच्या पथकाने दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा घटनास्थळी जाऊन अनधिकृत भाग पाडला
*भूमाफियांनी व विकासकांनी चौथ्यांदा तेथे बहुमजली इमारतीचे काम जोमाने सुरू केले
*आरक्षणाचा भंग एवढाच मुद्दा नसून मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असल्याचा नागरिकांचा आरोपhttps://maharashtramirror.com/ Pune News
Pune News :"प्लॉटवर जेव्हा जोत्याचे काम सुरू होते, तेव्हाच आम्ही पहिली कारवाई केली होती. त्यानंतरही दोन वेळा काम थांबवण्याची धडक कारवाई करण्यात आली. मात्र, कायदा धाब्यावर बसवून बांधकाम पुन्हा सुरूच ठेवले गेले. त्यामुळे अखेर आज संपूर्ण अनधिकृत इमारत पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अशा भूमाफियांवर आता कडक कलमांखाली थेट गुन्हे दाखल करण्याची तीव्र गरज आहे." - प्रवीण शेणडे, वरिष्ठ अधिकारी, पुणे महानगरपालिका बांधकाम विभागhttps://maharashtramirror.com/ Pune News
Pune News :पुणे: खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेले तब्बल २१ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पुणे महानगरपालिकेच्या (मनपा) बांधकाम विभागाने धडक कारवाई करत पूर्णपणे भुईसपाट केले आहे. महापालिकेच्या वतीने वारंवार नोटीस बजावून आणि तीन वेळा प्रत्यक्ष कारवाई करूनही हे अवैध बांधकाम पुन्हा पुन्हा सुरू ठेवण्यात आले होते. अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलत अख्खी इमारत पाडून टाकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील सर्व्हे क्रमांक ६३ मधील भूखंड हा पालिकेच्या विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असतानाही, कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता किंवा पालिकेचा बांधकाम आराखडा मंजूर न करून घेता या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वात आधी हे बांधकामाचा पाया सुरु असताना पहिली धडक कारवाई केली होती.
प्रशासकीय कारवाईला हरताळ
महापालिकेने पहिल्या टप्प्यात केलेल्या कारवाईनंतरही संबंधितांनी हे बेकायदेशीर काम थांबवले नाही. काही दिवसांतच त्यांनी पुन्हा छुप्या पद्धतीने बांधकाम सुरू केले. याची दखल घेत महापालिकेच्या पथकाने दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम रोखले आणि अनधिकृत भाग पाडला. मात्र, पालिकेच्या या कारवाईला पुरता हरताळ फासत भूमाफियांनी व विकासकांनी चौथ्यांदा पुन्हा तेथे बहुमजली इमारतीचे काम जोमाने सुरू केले.
आरक्षित जागेवर वारंवार होणाऱ्या या नियमबाह्य बांधकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. अखेर, महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोकलेन, जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने पूर्ण २१ हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडून संपूर्ण जागा मोकळी केली.
व्यावसायिक दुकाने अन् फ्लॅटच्या विक्रीचा बनाव
या संपूर्ण प्रकरणामागे केवळ आरक्षणाचा भंग एवढाच मुद्दा नसून मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या आरक्षित जमिनीवर व्यावसायिक दुकाने आणि निवासी फ्लॅट्स तयार करून त्यांची परस्पर विक्री करण्याचा बेत आखण्यात आला होता. सर्वसामान्य आणि अनभिज्ञ ग्राहकांना या अनधिकृत इमारतीतील जागा विकून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न सुरू होता. जर महापालिकेने ही कारवाई केली नसती, तर भविष्यात घर खरेदी करणाऱ्या निष्पाप नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असते.
महापालिकेच्या या धाडसी कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असले, तरी केवळ इमारत पाडून प्रश्न सुटणार नाही, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. "कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा बांधकाम सुरू होते, याचा अर्थ संबंधितांना कायद्याचा वा प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
त्यामुळे खेळाच्या मैदानाच्या जागेवर दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पालिकेच्या कारवाईला सतत आव्हान देणाऱ्या संबंधित विकसकांवर आणि भूमाफियांवर तात्काळ फौजदारी (क्रिमिनल) गुन्हे दाखल केले जाणार का, याकडे आता संपूर्ण खराडी परिसर आणि पुण्यातील जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
